नाशिकमध्ये अपघातात पाच डॉक्टर ठार
By admin | Published: May 19, 2015 02:22 AM2015-05-19T02:22:11+5:302015-05-19T02:22:11+5:30
झायलो गाडी टेम्पोवर आदळून झालेल्या अपघातात पिंपळगाव येथील पाच डॉक्टर जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंतजवळील कोकणगाव फाट्यावर सोमवारी पहाटे तीन वाजता झायलो गाडी टेम्पोवर आदळून झालेल्या अपघातात पिंपळगाव येथील पाच डॉक्टर जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाले आहेत.
डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे (४५), डॉ. संजय तिवारी (४७), डॉ. सुरज साहेबराव पाटील (४०), डॉ. कुंदन जाधव (३४), डॉ. प्रताप शेळके (४६, सर्व रा. पिंपळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात डॉ. उमेश भोसले गंभीर जखमी झाले आहेत.
हे सहा डॉक्टर नाशिक येथील वैद्यकीय शिबिर आटोपून झायलो गाडीने नाशिकहून पिंपळगावकडे
येत होते. ओझर (मिग) सोडल्यानंतर कोकणगाव फाट्यावरील गतीरोधकाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी समोरच्या टेम्पोवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की झायलो गाडीचा पुढचा निम्मा भाग दाबला गेला. त्यात पाच डॉक्टर जागीच ठार झाले. मागील सीटवर बसलेले डॉ. उमेश भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. गाडीचे दरवाजे दाबले गेलेले असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. पोलिसांनी गॅस कटर मागवून दरवाजा तोडून मृत व जखमींना बाहेर काढले. टेम्पो चालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)