पाच कार्यमुक्त, ५४ डॉक्टरांना अल्टीमेटम

By admin | Published: July 6, 2014 12:43 AM2014-07-06T00:43:20+5:302014-07-06T00:43:20+5:30

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Five doctors, ultimatum to 54 doctors | पाच कार्यमुक्त, ५४ डॉक्टरांना अल्टीमेटम

पाच कार्यमुक्त, ५४ डॉक्टरांना अल्टीमेटम

Next

मेस्माअंतर्गत कारवाई : आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत
नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. शनिवारी या डॉक्टरांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. याशिवाय स्थायी असलेल्या ५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी ८ वाजतापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. यामुळे मॅग्मोचे हे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत आहे.
कामाचे तास निश्चित करणे आणि २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करणे यासारख्या मागण्यांना घेऊन ‘मॅग्मो’ संघटनेच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून असहकार आंदोलन उभारले. गुरुवारी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाईची नोटीस बजावली. शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी नोटीस बजावलेल्या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करीत कार्यमुक्तीचे आदेश दिले. यात प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथील डॉ. सोनाली किरडे, टाकळखाट येथील डॉ. प्राजक्ता गुप्ता, नवेगाव खैरी येथील डॉ. प्रतीक बर्मा, मेंढला येथील डॉ. इब्राईन आणि कन्हान येथील डॉ. योगेश चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय ५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना शनिवारी नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या रविवारी सकाळी ८ वाजतापर्यंत कामावर रुजू न झाल्यास मेस्माअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा ई-मेल जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जीवाजी जोंधळे यांनी पाठविला आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थाच ‘सलाईन’वर
डॉक्टरांच्या असहकार आंदोलनामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थाच ‘सलाईन’वर आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि कंत्राटी डॉक्टरांवर देण्यात आलेल्या जबाबदारीमुळे ग्रामीण रुग्णांचे हाल सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपचार मिळत नसल्याच्या कारणाने रुग्णांना मेडिकल, मेयोमध्ये हलवीत आहे. ज्या डॉक्टरांवर रुग्णसेवेची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांना ग्रामीण रुग्णालयाची माहितीच नाही. यामुळे नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका जखमी रुग्णाला सिटीस्कॅनसाठी काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. विशेष म्हणजे या रुग्णालयात सिटीस्कॅनची सोयच नाही. अशाप्रकारचे अनेक गोंधळ उडत असून रुग्ण अडचणीत येत आहेत.
आंदोलन सुरूच राहणार
पाच डॉक्टरांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई झाल्यानंतरही आमचे असहकार आंदोलन सुरूच राहणार, असा निर्णय मॅग्मोने घेतला आहे, अशी माहिती संघटेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले, ‘मेस्मा’च्या नोटीसला उत्तर म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला कारागृहात डांबण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five doctors, ultimatum to 54 doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.