पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:24 PM2017-08-28T15:24:32+5:302017-08-28T15:27:08+5:30
पुणे, दि. 28- गणेशोत्सवाची सगळीकडेच नेहमी उत्सुकता असते. मुंबई असो किंवा पुणे प्रत्येक ठिकाणी मानाच्या समजल्या जाणाऱ्या बाप्पाच्या ...
पुणे, दि. 28- गणेशोत्सवाची सगळीकडेच नेहमी उत्सुकता असते. मुंबई असो किंवा पुणे प्रत्येक ठिकाणी मानाच्या समजल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करत असतात. लांबच लांब रांगा लावून गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळतं. अनेकदा तासनतास लांब रांगा लावूनही अनेकांना बाप्पाचं दर्शन घेता येत नाही. पण पुण्यामध्ये सध्या एक आगळीवेगळी संकल्पना राबवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे.
पुण्यात यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पुणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील दर्शनी भागांमधील भितींवर गणरायाची विविधं रुपं साकारण्यात येत आहेत. सारसबागेजवळील बाबुराव सणस क्रीडा संकुलाच्या संरक्षकभिंतीवर पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आकर्षक चित्रं रंगविण्यात आली आहे. भिंतीवर साकारलेली गणपतीही रूपं पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करत आहेत.
याठिकाणी मानाचा पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या गणपतींची सुंदर चित्रं रेखाटण्यात आलेली आहेत. सुबक चित्रं, आकर्षक रंगकाम नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. महापालिकेने एका खासगी कंपनीला हे काम दिले असून प्लॅस्टीक पेंटच्या माध्यमातून या भिंती रंगविण्यात येत आहेत. शहरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचू लागला आहे. भाविकांच्या उत्साहामध्ये यामुळे भर पडत असून पालिकेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
{{{{dailymotion_video_id####x845acu}}}}