‘कडकनाथ’ पालनात पाचशे कोटी अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 05:04 AM2019-08-26T05:04:12+5:302019-08-26T05:05:10+5:30
इस्लामपूर (जि.सांगली) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील ८ हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक ...
इस्लामपूर (जि.सांगली) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील ८ हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. कडकनाथ कोंबडी पालनाशी संबंधित कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.
गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीने १00 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे. लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करुन देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकºयांना विश्वास देऊन खरेदीची कंपनी हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही, असे सांगत कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर बोगस स्वाक्षºया आहेत, त्यावर नावाचा उल्लेख नाही. ‘लोकमत’ने या बोगस कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
फसवणूक झालेल्या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करावी, म्हणजे आम्हाला रितसर कारवाईसाठी प्रयत्न करता येतील. न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकºयांच्या पाठीशी आहे.
- राजू शेट्टी, माजी खासदार
आरोग्यदृष्ट्या फायदेशीरचा दावा
कडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी त्याची जाहिरातबाजीही केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी याबाबत कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. सांगली, इस्लामपूर येथील काही डॉक्टरांना विचारले असता त्यांनी, कडकनाथ कोंबडीच्या आरोग्यविषयक दाव्याबाबत काही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.