पाचशे दूध उत्पादक संस्था अवसायनात
By Admin | Published: December 27, 2016 06:17 PM2016-12-27T18:17:08+5:302016-12-27T18:17:08+5:30
शासकीय पातळीवर झाल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 96 टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था भकास झाल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 27 - शेतक-यांना जगवण्याची ताकद असलेल्या दुधाला नासवण्याचे काम राजकीय व शासकीय पातळीवर झाल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 96 टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था भकास झाल्या आहेत. शिवाय वर्षानुवर्षे कायदेशीरबाबींची पूर्तता न केल्यामुळे सहकारी विभागाच्या वतीने या संस्था अवसायनात काढल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण 565 सहकारी दूध संस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. 30 ते 35 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यापैकी ब-याच संस्था सुरळीत चालू असताना शासकीय व राजकीय अनास्थेमुळे सध्या डबघाईस आल्या आहेत. त्यामुळेच यापैकी केवळ 21 संस्था सद्यस्थितीत जिवंत आहे. तर 38 संस्था सद्यस्थिीत बंद आहे. शिवाय कायदेशीरबाबींचा पूर्तता न केल्यामुळे 507 दुग्धसंस्था अवसायनात काढल्या आहे.
गत पाच वर्षीचा दुष्काळ आणि अल्प व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण खचला आहे. या संकटातून उभा राहून सध्या खरिपाची तयारी बळीराजा करीत असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात आहे. मात्र शेतक-यांना आर्थिक बळ देणा-या या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय संस्थांच्या कारभारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील दूध जाते बाहेर
जिल्ह्यात सुरू असलेल्या 21 सहकारी दूध संस्थांमध्ये सरासरी 6361 प्रति. दिन लिटर दूध गोळा गेले जाते. यातही देऊळगावराजा येथील दूध संकलन केंद्रात गोळा होणारे दूध जालना जिल्हा आणि चिखली संकलन केंद्रातील दूध अकोला जिल्ह्यात पाठविले जाते. शिवाय नांदूर, मलकापूर, शेगाव या रेल्वे मार्गावर असलेल्या तालुक्यातील दूध मोठ्या प्रमाणात पॉवट आणि पॅकेटसाठी जळगाव व नागपूरकडे पाठविले जात आहे.
बरेच शेतकरी खासगी दूध संस्थेकडे वळले आहे, शिवाय जास्त भाव मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील दुध अकोल व जालना जिल्ह्यात जाते, पाच वर्षाच्या दुष्काळ परिस्थिती झळा सोसल्यानंतर ब-याच शेतक-यांची आपल्याकडील जनावरांची विक्री केली. परिणामी जिल्ह्यातील दुधसंस्था बंद पडल्या.
- एम. पी. मुळे
जिल्हा दुग्ध व्यवसाय उद्योग अधिकारी, बुलडाणा