पाचशे चौरस फुटांखालील घरांना करातून वगळणार
By admin | Published: April 21, 2015 01:13 AM2015-04-21T01:13:14+5:302015-04-21T01:13:14+5:30
मुंबईत ५०० चौफ़ुटांच्या जागेत राहणाऱ्या करदात्यांना करवाढीतून वगळण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे़
मुंबई : मुंबईत ५०० चौफ़ुटांच्या जागेत राहणाऱ्या करदात्यांना करवाढीतून वगळण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे़ यामुळे दक्षिण मुंबईतील जुन्या चाळी व इमारतींतील आठ लाख करदात्यांना मालमत्ता करातून दिलासा मिळणार आहे़
१ एप्रिल २०१० पूर्वलक्ष्यी प्रभावाने जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कर लागू करण्यात आला. परंतु त्यावेळीस नवीन करप्रणालीतून वगळण्यात आलेल्या ५०० चौफ़ुटांखालील घरांच्या मालमत्ता करामध्ये ४० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ मात्र यामध्ये बदल करीत ५०० चौफ़ुटांमधील घरमालकांना दिलासा देण्याचा निर्णय महासभेने घेतला़
जुन्या पद्धतीनुसार दक्षिण मुंबईतील जुन्या चाळीतील रहिवाशांना नाममात्र कर आकारला जातो़ त्यांच्या मालमत्ता करामध्ये पुढील पाच वर्षांसाठी ४० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला़ मात्र ही करवाढ अन्यायकारक असल्याने यातून ५०० चौफ़ुटांखालील घरांना वगळण्याची मागणी सभागृहात झाली़ त्यानुसार सवलतीचा नवीन प्रस्ताव स्थायी समितीपुढे येत असून यामुळे पालिकेला शंभर कोटींचे आर्थिक नुकसान होईल. (प्रतिनिधी)