पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना अटक
By admin | Published: March 30, 2017 04:19 AM2017-03-30T04:19:03+5:302017-03-30T04:19:03+5:30
पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएसडी डॉट्सची विक्री करणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना गुन्हे शाखेने ताब्यात
मुंबई : पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएसडी डॉट्सची विक्री करणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यात एका वाहिनीच्या सह निर्मात्याचा समावेश आहे. आरोपींकडून तब्बल ७० लाख किमतीचे एलएसडी जप्त केले आहेत. कांदिवलीच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.
कांदिवली येथील इनॉर्बिट मॉल परिसरात एक टोळी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ७० लाख किमतीचे तब्बल १४०० एलएसडी डॉट्स सापडले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला अरबाज ताज मोहम्मद खान (२०) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अंधेरी लोखंडवाला येथे राहणारा अरबाज बीएमएसचे शिक्षण घेत असून, त्याचे वडील व्यावसायिक आहेत. याच गुन्ह्यात त्याचा अंधेरीत राहणारा चुलत भाऊ फरहान अली खान (२६) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याचा रियल इस्टेट आणि कार विक्रीचा व्यवसाय आहे. तर या दोघांसोबत एका प्रसिद्ध वाहिनीचा सह निर्माता असलेल्या चारकोपच्या अदम्य समीर मोदीलाही (२२) अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी लक्ष्मण उर्फ निखिल राजन (२४) हा हार्डवेअर इंजिनीअर असून, पाचवा आरोपी चिराग महावीर जैन (२४) हा तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. जैन अंधेरी तर राजन मुलुंडचा रहिवासी आहे.
अटक आरोपी शाळकरी मित्र आहेत. गेल्या दोन वर्षांपासून झटपट पैसा कमाविण्यासाठी ते अरबाजसह एलएसडी विक्री करीत असल्याचे पोलीस तपासाअंती उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमेरिकेतून तस्करी
एका पेपरवर ड्रग्जचे ठरावीक एलएसडी ड्रग्जचा डॉट्स टाकला जातो. साधारण हे पेपर एक ते दोन सेंटीमीटर इतक्या आकाराचे असतात. ते जिभेवर ठेवताच विरघळतात. याच्या नशेत दिवसभर आपण काय करतो, याचे भान संबंधिताला राहत नाही. या ड्रग्जचा वापर पार्टीमध्ये केला जातो. याची नशा करणारा वर्ग हायप्रोफाइल आहे. अमेरिकेतून याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. भारतात एक एलएसडी डॉट्स पाच हजार रुपयांना विकला जातो.
वरळीतून तीन लाखांचा एमडी जप्त
वरळीतून ३ लाख किमतीच्या १५५ ग्रॅम एमडीसह इजाज सुपारीवाला (४०) याला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे. सुपारीवाला हा डोंगरीतील पठाणवाडी परिसरात राहतो.