कोंडाईबारी घाटात बस दरीत कोसळली, अपघातात पाच ठार तर ३५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:21 AM2020-10-22T08:21:10+5:302020-10-22T08:22:07+5:30
या भीषण अपघातात खासगी स्लीपर कोच बसचे अक्षरश: दोन तुकडे झाले. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. जखमींमध्ये दुसऱ्या बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे.
विसरवाडी (नंदुरबार) : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी पुलावरून खासगी बस बुधवारी पहाटे चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच ठार तर ३५ जण जखमी झाले. या भीषण अपघातात खासगी स्लीपर कोच बसचे अक्षरश: दोन तुकडे झाले. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. जखमींमध्ये दुसऱ्या बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत अपघातातील मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. मृतांमध्ये चालक, सहचालकासह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील १७ जण आहेत. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सुरत येथे, तर २६ जणांवर नंदुरबार येथे तर तीन जणांवर विसरवाडी येथे उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये प्रतिभा मुकेश मरोही (३६ रा. सुरत), अमर अशोक बारी (रा. पाचोरा), समशोद्दीन शेख युसूफ (४७ रा. भुसावळ), चालक वरदीचंद सोहनलाल मेघवाल (२४, रा. वेलदीया, जि. उदयपूर), सहचालक गणेश अंबादास नागरे (२३, रा. बुलडाणा) यांचा समावेश आहे.
‘येलदरी’तही बस उलटली
पुसद (जि. यवतमाळ) : पुणे येथून यवतमाळकडे येणारी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस खंडाळा-येलदरी घाटात उलटली. या अपघातात दोन जण ठार तर १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. विवेक जाधव (१३, रा. राहाटी, ता. दिग्रस) असे एका मृताचे नाव असून दुसऱ्या मृताची ओळख पटली नाही.