Maharashtra winter session 2021 : पेपर घोटाळ्याच्या मास्टरमाइंडचे मुख्यमंत्री निधीला पाच लाख; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:54 AM2021-12-28T06:54:56+5:302021-12-28T06:55:41+5:30
Devendra Fadnavis : सरकारच्या जमिनी लाटायच्या, मग त्यावर चारपट दराने सरकारकडून मोबदला घ्यायचा हे कासेगाव सोसायटीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. सिल्लोडमध्ये एका मंत्र्यांच्या संस्थेला सरकारने सहा महाविद्यालयांसाठी एकदम इरादा पत्र दिले, असे आरोप त्यांनी केले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटेसोबत सध्या गाजत असलेल्या परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाइंड डॉ. प्रीतीश देशमुखने मुख्यमंत्री सहायता निधीत पाच लाख रुपये दिले होते. त्याचे फोटो आणखी कोणाकोणासोबत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केला.
ग्रामविकास विभागात १,५०० कोटी रुपयांचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले, अखेर तक्रार आल्यानंतर ते रद्द केले गेले. शिवभोजन योजनेतही भ्रष्टाचार झाला आहे. सरकारच्या जमिनी लाटायच्या, मग त्यावर चारपट दराने सरकारकडून मोबदला घ्यायचा हे कासेगाव सोसायटीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. सिल्लोडमध्ये एका मंत्र्यांच्या संस्थेला सरकारने सहा महाविद्यालयांसाठी एकदम इरादा पत्र दिले, असे आरोप त्यांनी केले.
विकासकामे, मंत्रालय, अधिवेशन, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणे, मंदिरातच कोरोना होतो, पण नेत्यांकडील लग्नात, सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनात, महाविकास आघाडीतील पक्षांच्या बैठकीत कोरोना होत नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचा बेरोजगारीचा दर २२.६ टक्के आहे. झारखंड, केरळ, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तेलंगणसारख्या राज्यांचा बेरोजगारीचा दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, त्यांनी सांगितले.
विविध कामांत भ्रष्टाचाराचा आरोप
१८ रुपयांच्या मास्कची खरेदी ३७० रुपयांत, ४०० रुपयांची पीपीई किट २ हजार रुपयांत, पाच लाखांचे व्हेंटिलेटर १८ लाखांत असा भ्रष्टाचार कोरोना खरेदीमध्ये झाला. कोरोनाने झालेले हजारो मृत्यू या सरकारने लपविले. पीएम केअर्स फंडाला नावे ठेवता. या फंडात ३,०७६ कोटी रुपये जमा झाले, अन् ३,१०० कोटी रुपये जनतेसाठी मंजूर झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत ७९९ कोटी रुपये जमा झाले, अन् केवळ १९२ कोटी रुपयेच दिले गेले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.