एका पोटनिवडणुकीसाठी पाच लाख विद्यार्थी वेठीस; टीईटी परीक्षा पुन्हा महिनाभर लांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:28 AM2021-10-22T08:28:58+5:302021-10-22T08:29:16+5:30
राज्यातील केवळ एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात होणारी टीईटी परीक्षा अचानक महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : राज्यातील केवळ एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात होणारी टीईटी परीक्षा अचानक महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात राजकीय सुंदोपसुंदीमुळे तब्बल दोन वेळा या परीक्षेची तारीख बदलण्याची वेळ परीक्षा परिषदेवर आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी नेमकी ३१ ऑक्टोबर हीच तारीख राज्य शासनाने निवडली. त्यामुळे परीक्षा परिषदेला दोन पावले मागे येत टीईटी परीक्षेची तारीख बदलून ती ३० ऑक्टोबर करावी लागली. मात्र, आता केवळ दहा दिवस शिल्लक असताना गुरुवारी परीक्षा परिषदेने पुन्हा एकदा टीईटीची तारीख बदलून २१ नोव्हेंबर केली. टीईटीचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० पर्यंत होणार आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रकात म्हटले आहे.
या परीक्षेसाठी जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. याचेच निमित्त पुढे करून संपूर्ण राज्यभरातील परीक्षा केंद्रांना आणि उमेदवारांना परीक्षेसाठी महिनाभरानंतरची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होऊन परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे वर्षभरातच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला टीईटीसह अन्य परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांच्याही तारखा राजकीय दबावामुळे बदलाव्या लागल्या आहेत.
३० ऑक्टोबरला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
- तुकाराम सुपे, परीक्षा परिषदेचे आयुक्त