ताडोबातील वाघोबासाठी आले ५ लाख पर्यटक
By admin | Published: January 5, 2017 09:50 PM2017-01-05T21:50:55+5:302017-01-05T21:50:55+5:30
व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यातून १४ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. मात्र २०१६ मध्ये पर्यटकांची संख्या तुलनेने बरीच कमी दिसून आली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत पर्यटनासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे विचारणा केली होती. २०१२-१३ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत किती पर्यटक प्रकल्पात आले, यातून किती महसूल प्राप्त झाला, किती वाघांचा मृत्यू झाला, इत्यादी प्रश्नांची त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एकूण ५ लाख ३ हजार ८३१ पर्यटकांनी भेट दिली. ९७ हजार ६०४ वाहनांतून हे पर्यटक आले होते. पर्यटनातून व्याघ्र प्रकल्पाला एकूण १४ कोटी ८७ लाख ६ हजार ९३४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
५ वर्षांत पर्यटकांची संख्या ५ लाखांवर गेली असली तरी २०१६ मध्ये आकडेवारी घटल्याचे दिसून आले. जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत केवळ ६७ हजार ९५३ पर्यटकांनी भेट दिली व यातून २ कोटी ६० लाख ७७ हजार ९३२ रुपयांचा महसूल मिळाला.
१३ वाघांचा मृत्यू
२०१२ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत व्याघ्र प्रकल्पातील १३ वाघांचा मृत्यू झाला. यातील ९ मृत्यू नैसर्गिक होते. मात्र २ वाघांची शिकार झाली, तर २ वाघांचा अपघाती मृत्यू झाला. २०१२ व २०१५ मध्ये सर्वाधिक ४ वाघांचा मृत्यू झाला.
प्राणी, पक्ष्यांची माहितीच नाही
दरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात किती जंगली प्राणी व पक्षी आहेत याची नावासोबत संख्या उपलब्ध नाही. केवळ संकेतस्थळावर प्राणी व पक्ष्यांची सर्वसाधारण माहिती उपलब्ध आहे. सोबतच संबंधित कालावधीत किती विदेशी पर्यटकांवर कारवाई झाली, याची माहितीदेखील कार्यालयाकडे उपलब्ध नाही.