रॅलीनंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 09:34 PM2018-01-14T21:34:12+5:302018-01-14T21:34:23+5:30
सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली.
सांगली : सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. याबाबतची माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. घटनेनंतर दुपारी गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. ऐश्वर्या पोटाच्या विकाराने ग्रस्त होती व रविवारी तिची प्रकृती अधिकच बिघडल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून मुलीला आपण तातडीने पाच लाखाची मदत देऊ असे सांगितले. याबाबतची माहिती गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनाही दिली.
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत रविवारी सद्भावना रॅली काढण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन परत निघाले होते. ऐश्वर्या कांबळे ही विद्यार्थिनीही शिक्षक, विद्यार्थ्यांसोबत स्टेशन चौकमार्गे घरी निघाली होती. ती विठ्ठल मंदिरजवळ आली असताना, चक्कर आल्याने ती रस्त्यातच खाली बसली. शिक्षकांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तिने वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. तोपर्यंत ऐश्वर्याची प्रकृती अधिकच अत्यवस्थ बनली. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेमधून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.