पाच मांत्रिकांना जेलची हवा
By admin | Published: April 20, 2015 02:16 AM2015-04-20T02:16:23+5:302015-04-20T02:16:23+5:30
शनि अमावास्येच्या मुहूर्तावर भाविकांच्या समस्या निवारणासाठी अंगारे, धुपारे करत अंधश्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या मांत्रिकांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली.
विलास भोसले, पाटोदा (जि. बीड)
शनि अमावास्येच्या मुहूर्तावर भाविकांच्या समस्या निवारणासाठी अंगारे, धुपारे करत अंधश्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या मांत्रिकांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली. शनिवारी दुपारी तालुक्यातील दासखेड येथे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगनंतर गाशा गुंडाळून पळालेले मांत्रिक रात्री पुन्हा मंदिर परिसरात दाखल झाले आणि मध्यरात्री पोलिसांच्या सापळ्यात अडकले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे़
अटक केलेल्यांमध्ये लता महादेव खेडकर , आकाश दत्तू बन्सोडे, मीना दत्तू बन्सोडे, आजिनाथ तुळशीराम बटूळे , सखूबाई नवनाथ खेडकर यांचा समावेश आहे. वेताच्या छड्या, लिंबू, सुया, बाहुल्या, दाबण, कणिक असे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले.
शनिवारी अमावस्येनिमित्त बाजीबाबा मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. यावेळी काही मांत्रिकांनी भक्तांचे दरबार भरवून त्यांच्यावर मंत्र- तंत्र, जादू, धूप, अंगारे याद्वारे अघोरी उपचार सुरु केले होते. ‘लोकमत’ने हा अमानुष प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. पाटोदा ठाण्याचे पोलिसही तेथे धडकले; पण पोलिसांना पाहून मांत्रिक फरार झाले. त्यानंतर निरीक्षक एस. बी. हुंबे यांनी जमादार अशोक दराडे, राम बारगजे, विलास खरात, भाऊसाहेब आहेर, सुनीता खरमाटे यांच्यासमवेत पुन्हा मध्यरात्री मंदिरावर छापा टाकला.
यावेळी मांत्रिकांमार्फत भक्तांंवर अघोरी उपचार सुरु होते. अंधश्रद्धाळू भाविकांना वेताने मारहाण, लिंबू कापणे, अंगात येणे असे अघोरी उपचार सुरु होते. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन जेलची हवा दाखवली. याप्रकरणी रविवारी पहाटे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)