पाच पादचाऱ्यांना चिरडले
By admin | Published: January 23, 2017 03:59 AM2017-01-23T03:59:21+5:302017-01-23T03:59:21+5:30
ऊर्जानगर वसाहतीतील नागरिक सकाळच्या वेळेत परिसरात फेरफटका मारीत असताना एका मद्यधुंद मोटारचालकाने पाच
दुर्गापूर (चंद्रपूर) : ऊर्जानगर वसाहतीतील नागरिक सकाळच्या वेळेत परिसरात फेरफटका मारीत असताना एका मद्यधुंद मोटारचालकाने पाच जणांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
वसाहतीतून पर्यावरण चौक मार्गे चंद्रपूरकडे येणाऱ्या मार्गावरील रिजेक्ट गेटपर्यंत अनेक नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ करतात. रविवारी सकाळी ६च्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या फोर्ड इको स्पोर्ट कारने पाच पादचाऱ्यांना ठोकरले. विठ्ठल दडमल (४०), प्रदीप बागमवार (५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुनील तुप्तेवार (४२), भास्कर मुसळे (४०), किशोर ठाकरे (४०) हे तिघे गंभीर जखमी झाले. यातील तुप्तेवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे तर अन्य जखमीवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अपघातानंतर वाहनचालकाने पळ काढला. मात्र काही अंतरावरच रस्त्याच्या कडेला त्यांची कार आदळली. लागलीच स्थानिक नागरिकांनी कारचालक सचिन येलमुले व बाजूला बसलेला कार मालक पंकज शिंदे या दोघांनाही पकडून ठेवले व नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांनाही अटक केली असून हे दोघेही मद्यधुंद असल्याचे आढळले. मृत, जखमी व आरोपी हे सर्वच वीज केंद्राचे कर्मचारीआहेत. (वार्ताहर)