पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

By Admin | Published: April 3, 2017 03:24 AM2017-04-03T03:24:03+5:302017-04-03T03:24:03+5:30

खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Five people arrested in the attack on the journalist | पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

googlenewsNext

नवी मुंबई : खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात भाजपा आमदाराच्या चुलत भावाचाही समावेश असून सोसायटीच्या वादातून त्यांनी हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
शुक्रवारी खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे मित्र संतोष फतारे यांच्यावर हल्ल्याची घटना घडली होती. या घटनेच्या तपासाकरिता आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी व कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान सूर्यवंशी राहत असलेल्या कल्पतरू सोसायटी ते घटनास्थळ दरम्यानचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता, काही जण त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसले. त्यापैकी एका बॉडीबिल्डरचे छायाचित्र काढून पोलिसांनी पनवेलमधील जिममध्ये चौकशी केली असता, मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार घटनेच्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी एकाला पेणमधून तर चौघांना लोणावळा येथून अटक केली. मयूर कृष्णा ठाकूर (३0), आकाश कृष्णा पाटील (२४), अशोक जगन्नाथ भोईर (३0), विश्वास आत्माराम कथारा (३0), अनंता तुकाराम कथारा (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मयूर हा आ. प्रशांत ठाकूर यांचा चुलत भाऊ आहे, यामागे राजकीय कारण नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मयूर हा सूर्यवंशी यांचा शेजारी असून त्यांच्यात सतत भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी सोसायटीमध्ये भाजपाची पत्रके वाटताना सूर्यवंशी यांनी विरोध केल्याने देखील त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणातून त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा सूर्यवंशी यांचा आरोप आहे. सूर्यवंशी यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने मयूरने त्याच्या चार मित्रांना सुपारी दिली होती. यानुसार आकाश, अशोक, विश्वास व आत्माराम यांनी सूर्यवंशी यांना एकांतात गाठून त्यांच्यावर हल्ला केला.

Web Title: Five people arrested in the attack on the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.