भय्यू महाराजांवरील हल्लाप्रकरणी पाच जणांना अटक
By admin | Published: May 12, 2016 03:37 AM2016-05-12T03:37:40+5:302016-05-12T03:37:40+5:30
राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचे चालक प्रशांत देशमुख यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून यात ट्रकचालकाचा समावेश आहे.
शिरूर : राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचे चालक प्रशांत देशमुख यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून यात ट्रकचालकाचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी ही माहिती दिली.
ट्रकचालक अशोक पवार (रा. जळगाव), त्यांचा सहायक रवि राठोड तसेच सागर तावरे, सुहास बांदल व विशाल शिंदे (तिघेही रा. रांजणगाव गणपती, शिरूर) यांच्यावर दंगल माजवून शिवीगाळ करून तसेच धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मे रोजी भय्यूजी महाराज पुण्याहून इंदूरकडे जात असताना रांजणगाव गणपती येथे बसस्थानकाजवळ त्यांच्या आॅडी मोटारीला एका ट्रकची धडक बसली. या वेळी ट्रकमधून चालक पवार व सहायक राठोड उतरले. त्यांच्यात व भय्यूजी महाराज यांच्या गाडीचे चालक देशमुख यांच्यात बाचाबाची झाली.
‘बसस्थानकाजवळ असलेल्या तावरे, बांदल व शिंदे यांनीही आपणांशी बाचाबाची केली. बाचाबाचीतून पाचही जणांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकीही दिली,’ असे देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)