फॅंड्रीत काम करणा-यासह घरफोडी करणाऱ्या ५ जणांना अटक
By admin | Published: June 27, 2016 07:49 PM2016-06-27T19:49:19+5:302016-06-27T20:13:26+5:30
फॅंड्री तसेच प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.२७ - फॅंड्री तसेच प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़. त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा ६१५ ग्रॅम वजनाचे सोने त्यामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने, १० तोळे वजनाची सोन्याची लगड, तसेच ४९६ ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू त्यामध्ये १३ नाणी, १३ चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, २ मनगटी घड्याळे, सोने वितळविण्यासाठी वापरलेली मशीन जप्त करण्यात आले़.
योगेश बाबा चौधरी (वय १९, रा़ कासेवाडी), अमोल किसन अवचरे (वय १९, रा़ कासेवाडी), प्रतिक संजय वाघमारे (वय २०, रा़ शेवाळवाडी, हडपसर) तसेच चोरीचा माल विकत घेणारे बिपिन बाळकृष्ण कुलकर्णी (वय ३९, रा़ अमृतेश्वर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) आणि सराफ व्यवसायिक सागर अशोक शहाणे (वय २६, रा़ तुपेवस्ती, उरळी कांचन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याबाबत पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील यांनी सांगितले, की दत्तवाडी, स्वारगेट येथील घरफोडीच्या गुन्'ांचा समांतर तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कासेवाडी झोपडपट्टीतील काही मुले पिंपरी भागात सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आले होते़ त्याआधारे तपास करता अमोल अवचरे, योगेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी ८ ते १० दिवसांपूर्वी पर्वतीगाव येथील एका बंगल्यात घरफोडी केल्याची माहिती मिळाली़ योगेश चौधरी याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये सोन्याचे गंठण, आंगठी व सोन्याचे वाटीचा कापलेला पत्रा मिळाला़ त्यानंतर त्याने दोन अल्पवयीन मुलासह पर्वती गावातील एका बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली़ २७ मे ते १० जून दरम्यान चंदन बंगला बंद असताना बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करुन २३ लाख १८ हजार ५०० रुपयांचे १ किलो वजनाचे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरुन नेल्याचे फिर्यादीने सांगितले़ ही माहिती मिळाल्यावर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले़ तसेच सोन्याचे दागिने विकण्यासाठी मध्यस्थी करणारा प्रतिक वाघमारे व चोरीचा माल विकत घेणारा बिपिन कुलकर्णी व सराफ सागर शहाणे यांना अटक केली़
आरोपी दुपारच्यावेळी पर्वती पायथा परिसरात फिरत असताना त्यांना बंगला बंद असल्याचे दिसले़ त्यांनी अॅक्सा ब्लेड खरेदी करुन रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला़ त्यांनी स्वारगेट भागातही घरफोडी केल्याचे उघड झाले आहे़ गुुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सी़ एच़ वाकडे, पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक विलास पालांडे,कर्मचारी संजय गवारे, अमित गायकवाड, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, गणेश काळे, दिलीप लोंखडे, धर्मराज आवटे, प्रविण दळे, राजाराम काकडे, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, स्वप्निल शिंदे, प्रमोद हिरळकर व मोहनदास पाटील या पथकाने ही कामगिरी केली आहे़
पैशाच्या हव्यासापोटी योगेश चौधरी गुन्हेगारीकडे
योगेश चौधरी याने फॅंड्रीत शाळेमधील विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका केली आहे़ फ्रेंड्रीत त्यांची अगोदर मुख्य भूमिकेसाठी आॅडिशन घेतली असल्याचे तो सांगतो़ याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा तसेच प्रिझम या लघुपटात काम केले आहे़ पण, अर्धवट शिक्षण, कासेवाडी झोपडपट्टीत बालगुन्हेगार असलेले अमोल अवचरे व इतरांची सोबत आणि पैशाच्या हव्यासापोटी तो यांच्याबरोबर गुन्ह्यामध्ये अडकला़