दोन डॉक्टरांसह पाचजणांना अटक

By admin | Published: March 9, 2017 01:13 AM2017-03-09T01:13:23+5:302017-03-09T01:13:23+5:30

म्हैसाळ भ्रूण हत्याकांड : कर्नाटकातील विजापूर, कागवाडला पोलिसांचा छापा; चार सोनोग्राफी यंत्रे जप्त

Five people arrested with two doctors | दोन डॉक्टरांसह पाचजणांना अटक

दोन डॉक्टरांसह पाचजणांना अटक

Next

सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना यश आले. खिद्रापुरेसाठी महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या विजापूर व कागवाड येथील दोन डॉक्टरांसह पाचजणांना बुधवारी अटक करण्यात आली. यात खिद्रापुरेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या परिचर व परिचारिकांसह गर्भपातासाठी औषध पुरविणाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सोनोग्राफी यंत्रे जप्त केली आहेत.
अटक केलेल्यांमध्ये डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय ६४, रा. विजापूर), डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (६८, रा कागवाड, ता. अथणी), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक कांचन कुंतिनाथ रोजे (३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) व गर्भपातासाठी औषधाचा पुरवठा करणाऱ्या सुनील काशिनाथ खेडकर (३५, रा. माधवनगर, सांगली) याचा समावेश आहे. यापैकी घोडके, रोजे व साळुंखे या तिघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याने अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर चौकशीत म्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले १९ भ्रूण सापडले होते. डॉ. खिद्रापुरे याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. खिद्रापुरे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कर्नाटकातील डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर सांगली पोलिसांच्या पथकाने कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके याच्या रुग्णालयावर मध्यरात्री छापा टाकून तेथील दोन सोनोग्राफी यंत्रे, रुग्णांच्या नोंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. याशिवाय खिद्रापुरे याला मदत करणारा त्याचा सहाय्यक उमेश साळुंखे व गर्भपातासाठी मदत करणाऱ्या सौ. कांचन रोजे या परिचारिकेसही पोलिसांनी रात्री अटक केली. न्यायालयाने डॉ. घोडकेसह तिघांनाही दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
खिद्रापुरे याने विजापूर येथील डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर याच्याकडून काही रुग्णांची सोनोग्राफी करून घेतल्याचे तपासात समोर आले. बुधवारी पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले. सायंकाळी पाच वाजता डॉ. देवगीकर याच्या रुग्णालयावर छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या रुग्णालयातील दोन सोनोग्राफी यंत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
खिद्रापुरे याला गर्भपातासाठी माधवनगर येथून गोळ्याचा पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले होते. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी रात्री माधवनगरमध्ये छापाही टाकला होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या सुनील काशिनाथ खेडकर (वय ३५, रा. सोमवार पेठ, माधवनगर) याला अटक केली आहे. तो माधवनगरमधील रत्ना डिस्ट्रीब्युटर्सकडे नोकरीस होता. भ्रूण हत्याकांडात आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली असून, चार सोनोग्राफी यंत्रे जप्त करण्यात आली.


डॉ. घोडकेकडून गर्भलिंग तपासणी
गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ. श्रीहरी घोडके यास अटक झाल्याने डॉ. खिद्रापुरे यास मदत करणाऱ्या वैद्यक तज्ज्ञांत खळबळ उडाली आहे. डॉ. घोडके भूलतज्ज्ञ असून, तो कागवाडमध्ये गेली ४० वर्षे रुग्णालय चालवीत आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्याने रुग्णांवर उपचार बंद करून सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भलिंग तपासणी सुरू केली होती. कागवाडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या डॉ. घोडके याच्यावर चार वर्षांपूर्वी छापा टाकण्यात आला होता; मात्र प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अटकेमुळे मिरजेत पोलिस ठाण्याच्या आवारात कागवाडमधील राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे. या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. भ्रूणहत्येला मदत करणाऱ्यांविरोधात सबळ पुरावे जमा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल.
- दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख

पत्नीची चौकशी सुरू : या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सांगली, मिरजेतील काही डॉक्टरांचीही चौकशी केली जाणार आहे. डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील कागदपत्रे व संगणकावरील नोंदीवरून, पोलिसांनी गर्भपाताच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्याला स्त्री भ्रूणहत्येसाठी डॉक्टर पत्नीने मदत केल्याचा संशय असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


खिद्रापुरेची म्हैसाळात तीन तास चौकशी
बुधवारी सायंकाळी सहा वाजता गर्भपात प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला पोलिसांनी म्हैसाळ येथे आणले. प्रथम म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याच्या मालकीच्या भारती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या रुग्णालयातील बा'रूग्ण विभाग, तळघर, शस्त्रक्रिया विभाग, त्याचा राहता बंगला अशा सर्व ठिकाणी नेऊन त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. तब्बल तीन तास त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, खिद्रापुरेला चौकशीसाठी आणल्याची माहिती गावात पसरताच मोठी गर्दी जमली होती. मात्र, पोलिसांनी गावातून शांतिसागर वसाहतीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करून नागरिकांना रोखले.

Web Title: Five people arrested with two doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.