खालापूरमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू
By admin | Published: June 8, 2017 06:10 AM2017-06-08T06:10:35+5:302017-06-08T06:10:35+5:30
खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : खालापूर तालुक्यातील शिरवली गावामधील दोन महिला व त्यांच्याबरोबर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८), गौरी गणेश आरते (३३), तेजस्विनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने शिरवलीसह संपूर्ण तालुकाच हादरून गेला आहे.
बुधवार, ७ जून रोजी खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील मीनाक्षी आणि गौरी या नेहमीप्रमाणे सकाळी कपडे धुण्यासाठी गावाला लागून असलेल्या बाळगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. या वेळी त्यांच्याबरोबर शुभम, तेजस्विनी अणि तुषार तीन मुलेही होती. यातील शुभम पाण्यात आंघोळीसाठी उतरला. थोड्यावेळाने तो खोल पाण्यात बुडायला लागल्याचे बघून त्याची आई मीनाक्षी त्याला वाचविण्यासाठी धावली. ती बुडायला लागल्याचे बघून तेजस्विनी अणि तुषार तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, पाणी खोल असल्याने व पोहता येत नसल्याने ती मुलेही बुडायला लागली. हे बघून त्यांची आई गौरी त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तीही बुडाली. तिकडे कपडे धूवत असलेल्या तिसऱ्या महिलेने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यात तिला अपयश आले. त्या महिलेचे नाव कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरपट्टे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी धाव घेतली.
>गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ
गावातील एक व्यक्ती नदीकडे येत असल्याने, त्याने हा प्रकार बघून आरडाओरडा करून गावातील लोकांना मदतीसाठी बोलाविले. काही वेळातच गावातील तरु ण व नागरिकांनी नदीकाठी धाव घेत मदत करण्यास सुरु वात केली, मात्र पाण्यात बुडून पाचही जणांचा मृत्यू झाला. या वेळी गावातील सर्वांनी धावाधाव करून बुडालेल्यांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला.