नक्षल नेता भास्करसह पाच जण चकमकीत ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:59 AM2021-03-30T06:59:35+5:302021-03-30T07:00:08+5:30
मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.
गडचिरोली : मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. त्यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर ऋषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हिचामी (४६ वय) याच्यासह दोन महिला नक्षल्यांचा समावेश आहे. नक्षल नेता भास्करवर २५ लाखांचे तर सर्व मृत नक्षलवाद्यांवर मिळून एकूण ४३ लाख रुपयांचे बक्षीस होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी घातपाती कारवायांचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएसपी (अभियान) मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात अभियान तीव्र करण्यात आले.
चार रायफली जप्त
पोलिसांच्या सी-६० पथकाने शनिवारी झालेल्या चकमकीत नक्षल्यांचा कट उधळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत पाच नक्षली ठार झाले. दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीनंतर अन्य नक्षलवादी जंगलात पसार झाले.
घटनास्थळावरून नक्षल्यांकडील एके-४७ रायफल, एक १२ बोअर रायफल आणि एक ३०३ आणि एक ८ एमएम रायफल, एक लॅपटॉप तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले.