मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रन पाच जण जखमी
By admin | Published: January 23, 2016 04:09 AM2016-01-23T04:09:52+5:302016-01-23T04:09:52+5:30
क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव मर्सिडीजने फुटपाथवरील पाच जणांना धडक देण्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली
मुंबई : क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव मर्सिडीजने फुटपाथवरील पाच जणांना धडक देण्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत चार महिलांसह एक ४वर्षीय चिमुरडा जखमी झाला आहे. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी हाजी अमीन युसूफ खान (४५) याला पायधुनी पोलिसांनी गजाआड केले आहे.
महंमद अली रोडवरील कोलंबो जंक्शन येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. रात्री साडेअकराच्या सुमारास येथील पटेल हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा घेतला. त्यानंतर टू सीटर मर्सिडीजने तो क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने निघाला. कोलंबो जंक्शन येथे वळण घेताना त्याने फुटपाथवर पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली. तेथे झोपलेले पाच जण चिरडले गेले. खानने घटनास्थळावरून पळ काढला. मुनीरा रमजान शेख (२५), अलिशा शेख (४०), आयेशा शेख (४०) रशीदा शेख (२५) आणि ४ वर्षीय राहुल शेखचा यात समावेश आहे. यापैकी चौघांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. मुनीरावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायधुनी पोलिसांनी या अपघातानंतर घटनेनंतर पाऊण तासाने खानला अटक केली. (प्रतिनिधी)