मराठवाड्यात पाच टक्के पाणीसाठा
By admin | Published: March 18, 2016 02:30 AM2016-03-18T02:30:43+5:302016-03-18T02:30:43+5:30
दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा राहिला आहे. बाष्पीभवन आणि दैनंदिन वापर लक्षात घेता हा साठा ५ आठवडेही पुरणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडतो आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात विभागातील धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा होऊ शकला. परिणामी डिसेंबरपासूनच मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ज्या धरणांमध्ये पाणीसाठा होता तोही आता जवळपास संपला आहे. उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, सध्याचा दैनंदिन वापर, यामुळे या धरणांमधून दररोज ९ दलघमी पाणी संपत आहे. याच दराने हा साठा संपत गेल्यास येत्या पाच आठवड्यांतच तो शून्यावर येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- मराठवाड्यात सर्वात वाईट अवस्था ही मध्यम साठा असणाऱ्या धरणांची आहे. विभागात एकूण ७५ मध्यम धरणे असून सद्य:स्थितीत त्यातील ४९ धरणे कोरडी ठणठणीत आहेत. यात सर्वाधिक १६ धरणे ही उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १३, लातूर जिल्ह्यात ७, जालना जिल्ह्यात ३, औरंगाबाद जिल्ह्यात ५, नांदेड जिल्ह्यात ४ आणि परभणी जिल्ह्यातील २ धरणांचा यामध्ये समावेश आहे.