पाच रुपयांचा चहा.. दहा रुपयांचा चेक !

By Admin | Published: October 5, 2014 02:12 AM2014-10-05T02:12:02+5:302014-10-05T02:12:02+5:30

बॅँकेसमोर नेतेमंडळींची प्रचंड रंग लागलेली. सुट्टीचा दिवस असूनही केवळ उमेदवारांच्या आग्रहाखातर बॅँक उघडण्यात आलेली.

Five rupees tea .. 10 rupees check! | पाच रुपयांचा चहा.. दहा रुपयांचा चेक !

पाच रुपयांचा चहा.. दहा रुपयांचा चेक !

googlenewsNext
>(स्थळ : बॅँकेसमोर नेतेमंडळींची प्रचंड रंग लागलेली. सुट्टीचा दिवस असूनही केवळ उमेदवारांच्या आग्रहाखातर बॅँक उघडण्यात आलेली.)
पहिला उमेदवार : (चुटपुटत) एक तास झाला, रांगेत उभारलोय. एवढय़ा वेळेत दोन-चार कॉलन्यांचा प्रचार झाला असता रे दादा.
दुसरा उमेदवार : (चरफडत) मी तर कालच पोतं भरून चेकबुक्स घेऊन गेलो होतो. एकाच रात्रीत सारे संपले. पुन्हा सकाळी याच बॅँकेत हजर. प्रचार गेला बोंबलत. सरका पुढंùù.
तिसरा उमेदवार : (डोळे मिचकावत) म्हणूनच नेतेमंडळींनी एका बॅँकेवर अन् एका बायकोवर विसंबून राहू नये. वेगवेगळ्य़ा ठिकाणी ‘अकौऊंट’ ओपन करून ठेवावेत. इकडच्या खात्यातला ‘इंटरेस्ट’ संपला की, तिकडच्या खात्यात ‘ट्रॅँक्ङॉक्शन’ करायला आपण मोकळे बघा आप्पा.  
चौथा उमेदवार  : (डोकं खाजवत) पण, आपला साराच व्यवहार अंधारातला. बापजन्मी कधी ‘खातं’ खोलणं माहीत नव्हतं. आता या निवडणूक आयोगानं लावलंय आपल्याला कामाला. म्हणो, ‘प्रत्येक निवडणूक खर्च चेकनंच व्हायला हवा.’ जाऊ दे रांग पुढंùù.
पहिला उमेदवार : (फुशारकीनं) मी तर गेल्या सात-आठ दिवसांत ट्रॉली भरून चेकबुक्स घेऊन गेलो रे भाऊ.
(एवढय़ात चेकबुक्सच्या बंडलांनी भरलेला भलामोठ्ठा ट्रक येतो. जेसीबी अन् क्रेनच्या मदतीनं बंडलं उतरविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. )
दुसरा उमेदवार : (दुखणारा हात दाबत) बॅनरवाल्यापासून ते रिक्षावाल्यार्पयत सर्वानाच चेक देत असल्यानं मी तर माङया सहीचा शिक्काच तयार करून घेतलाय राव.
तिसरा उमेदवार :  (खोचकपणो) पण, त्या शिक्केवाल्यालाही चेकच दिलात नां चव्वेचाळीस रुपये पन्नास पैशांचा? व्हा म्होरंùù.
चौथा उमेदवार : (पुढं सरकत) पण, मला एक कळेनासं झालंय. आज अचानक आपल्या उमेदवारांच्या रांगेत एवढी गर्दी कशी काय वाढलीय ?
पहिला उमेदवार : (गंभीरपणो) जरा नीट निरखून बघा पुढं-मागं. आपण ज्या-ज्या कॅन्टीन अन् जीपवाल्यांना चेक दिलेत, ते सारे आज त्याचं खातं उघडायला इथंच आलेत. सरका पुढं दादाùù.
दुसरा उमेदवार : (मागच्याच्या कानात पुटपुटत) काल तर माङया खिशातून बायकोनं दोन चेक हळूच काढले अन् आमच्या धाकटय़ा लेकराला चॉकलेटसाठी दिले.
तिसरा उमेदवार : (गोंधळात पडत) पण, तुम्हाला कसं काय कळालं ते ?
दुसरा उमेदवार : तो किराणा दुकानदार आला नां ओरडत. म्हणाला,‘ असला चेक-बिकचा उरफाटा धंदा मी नाय करत. नेत्याची नवी कोरी नोट मी धा-धा येळा उलटून पालटून बघत असतुया. तवा तुमच्या चेकवरती कोण ईश्वास ठेवणार?’ तेव्हा खवळून मी माङया लेकराला शंभराची नोट देऊन टाकली बघा भाऊ.
( एवढय़ात या उमेदवाराची बायको येते पळत.)
बायको : ( धापा टाकत) अवो धनीùù संमदा घात झाला. आपल्या बंडय़ाला पोलिसांनी पकडलंय. चॅनलवाल्यांनाबी म्हनं त्यांनी बोलावलंय. ‘एवढी शंभर रुपयांची कॅश कुठनं अन् कशापायी आणलीय?’ असं इचारूनशान त्यांनी आपल्या लेकराला पाùùर भंडावून सोडलंय.
                                        - सचिन जवळकोटे

Web Title: Five rupees tea .. 10 rupees check!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.