मुंबईच्या समुद्रात ‘पंचतारांकित’ अनुभव
By admin | Published: March 11, 2017 01:45 AM2017-03-11T01:45:49+5:302017-03-11T01:45:49+5:30
सी-प्लेन, चौपाट्यांचा विकास यांसह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता मुंबईतील समुद्रात जहाज असणारे पाच मजली तरंगते हॉटेल
मुंबई : सी-प्लेन, चौपाट्यांचा विकास यांसह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता मुंबईतील समुद्रात जहाज असणारे पाच मजली तरंगते हॉटेल पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन केले जाईल. मात्र हे हॉटेल पर्यटकांच्या सेवेत पुढील आठवड्यात येईल. जवळपास ५00पेक्षा अधिक पर्यटकांची क्षमता हॉटेलची आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसी, (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ), महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड हे मुंबईकर आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा एका खाजगी कंपनीच्या साहाय्याने देणार आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटन स्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. पर्यटकांसाठी सी-प्लेन सेवेचा आणि तीन चौपाट्यांचा टप्प्याटप्प्यात विकास करण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. याचबरोबर आता मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एका खासगी कंपनीच्या साहाय्याने आणले जात आहे. हे पंचतारांकित हॉटेल म्हणजे एक जहाज असून, ते पाच मजली आहे. तरंगणाऱ्या अशा पाच मजली हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी अनेक सोईसुविधा असतील. बँक्वेट (समारंभासाठी हॉल), रेस्टॉरंट, सभागृह असेल. अमेरिकेतील फ्लॉरिडा येथे बनलेल्या या तरंगणाऱ्या हॉटेलची एकूण किंमत ही ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मुंबईकर आणि खासकरून पर्यटकांसाठी हे हॉटेल दुपारी सुरू होऊन रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच त्याची वेळ पहाटे ३ वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे.
भुजबळांच्या हस्तेही झाले होते उद्घाटन
२0१४ साली राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या तरंगते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव उद्घाटनानंतर ते बंद झाले. आता या हॉटेलमध्ये बरेच बदल करून पुन्हा नव्याने सुरू केले जात आहे.