पंचतारांकित हॉटेल्सचा ‘सिडको’ला विसर

By admin | Published: March 27, 2017 03:56 AM2017-03-27T03:56:30+5:302017-03-27T03:56:30+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने २०१९ची डेडलाइन निर्धारित केली आहे. पण विमानतळ क्षेत्रात देश-विदेशातील

Five-star hotels forgot 'CIDCO' | पंचतारांकित हॉटेल्सचा ‘सिडको’ला विसर

पंचतारांकित हॉटेल्सचा ‘सिडको’ला विसर

Next

कमलाकर कांबळे /नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने २०१९ची डेडलाइन निर्धारित केली आहे. पण विमानतळ क्षेत्रात देश-विदेशातील प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेल्या पंचतारांकित हॉटेल्सचा सिडकोला विसर पडला आहे. विशेष म्हणजे, हॉटेल्ससाठी या क्षेत्रात अनेक भूखंड आरक्षित ठेवले असले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. विमानाचे टेकआॅफ होण्याअगोदर म्हणजे पुढील दोन-अडीच वर्षांत या परिसरात पंचतारांकित हॉटेल्स सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, आतापर्यंत सिडकोने हॉटेल्स उभारणीस एकाही कंपनीला निमंत्रण दिलेले नाही.
सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या महिन्यात विमानतळ उभारणीची आर्थिक निविदा निश्चित करण्यात आली असून जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका दिला आहे. प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळ गाभा क्षेत्रातील दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रीनफिल्ड विमानतळ असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल. देश-विदेशातील प्रवासी येथून प्रवास करतील. त्यांच्या सुविधेसाठी, निवासासाठी येथे पंचतारांकित हॉटेल्स उभारणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी ३० ते ४० भूखंड आरक्षित ठेवले आहेत. पुढील दोन-अडीच वर्षांत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा ध्यास सिडकोने घेतला आहे. विमानाचे पहिले उड्डाण २०१९मध्येच होईल, यावर सिडको ठाम आहे. त्यानुसार आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर आतापासूनच पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांना आमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, त्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

नियोजन गरजेचे
नवी मुंबईत एक ते दोन पंचतारांकित हॉटेल्स आहेत. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर शहरात अशा हॉटेल्सची संख्या वाढणे आवश्यक आहे. विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल्सचे आतापासूनच नियोजन होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज म्हणून या परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. लवकरच निविदा काढून हॉटेल्सच्या उभारणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Five-star hotels forgot 'CIDCO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.