कर्नाटकातील दोन डॉक्टरांसह पाच अटकेत
By Admin | Published: March 9, 2017 01:43 AM2017-03-09T01:43:45+5:302017-03-09T01:43:45+5:30
म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना यश आले. खिद्रापुरेसाठी गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या विजापूर व कागवाड येथील दोन डॉक्टरांसह पाचजणांना बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून प्रत्येकी दोन अशी चार सोनोग्राफी यंत्रेही जप्त केली आहेत.
डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय ६४, रा. विजापूर), डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (६८, रा कागवाड, ता. अथणी), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक सौ. कांचन कुंतिनाथ रोजे (३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) व गर्भपातासाठी माधवनगर येथून औषधाचा पुरवठा करणाऱ्या सुनील काशिनाथ खेडकर (वय ३५, रा. माधवनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी घोडके, रोजे व साळुंखे या तिघांना न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
डॉ. खिद्रापुरेने विजापूर येथील डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर याच्याकडून काही रुग्णांची सोनोग्राफी करून घेतल्याचे तपासात समोर आले. बुधवारी पोलिसांनी देवगीकरच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)
डॉ. घोडकेचे
राजकीय कनेक्शन
डॉ. घोडके भूलतज्ञ असून तो कागवाडमध्ये गेली ४० वर्षे रुग्णालय चालवत आहे. गेल्या पाच वर्षापासून त्याने सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग तपासणी सुरू केली होती. कागवाडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या डॉ. घोडके याच्यावर चार वर्षापूर्वी छापा टाकण्यात आला होता. मात्र, प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अटकेमुळे मिरजेत पोलिस ठाण्याच्या आवारात कागवाडमधील राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
संयुक्त समिती स्थापणार
आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे भेट देऊन, डॉ. खिद्रापुरे याचे रुग्णालय आणि त्याने भ्रूण पुरलेल्या ठिकाणाची पाहणी केली. खासगी रूग्णालयांचे नियंत्रण करणाऱ्या मुंबई नर्सिंग कायद्यात सुधारणा करण्यात येईल, सीमाभागात महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नियुक्त करून अशा प्रकरणांना प्रतिबंध घालण्यात येईल असे सांगून याबाबत सभागृहात निवेदन करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
पत्नीची चौकशी, पुरलेले भ्रूण मुलींचेच
डॉ. खिद्रापुरेला गर्भपातासाठी त्याच्या डॉक्टर पत्नीने मदत केल्याचा संशय असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण मुलींचे असल्याचा संशय असून, डीएनए तपासणीच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.