भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पाच अटकेत

By admin | Published: June 18, 2017 03:38 AM2017-06-18T03:38:49+5:302017-06-18T03:38:49+5:30

पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४.१ आर जागेच्या मूळ मालकांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून बनावट दस्ताद्वारे बोगस खरेदी-विक्रीचा प्रकार ‘लोकमत’ने

Five suspects in plot fraud | भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पाच अटकेत

भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पाच अटकेत

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

लोणावळा : पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४.१ आर जागेच्या मूळ मालकांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून बनावट दस्ताद्वारे बोगस खरेदी-विक्रीचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन
जमीन गैरव्यवहारातील पाच जणांना चौकशीसाठी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली. त्यांना मदत करणारे
आणखी काही साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
जमीन गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी मनीष चंद्रकांत पांडे (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, ता. मुळशी), अविनाश श्याम सुळे (वय २४, रा. भांगरवाडी, लोणावळा), मोहंमद सलीम इलियास शेख (वय ५५, रा. साईबाबा मंदिराजवळ यशवंतनगर, येरवडा), संदीप नथू शेळके (वय २५, रा. वलवण, लोणावळा), प्रमोद ज्ञानेश्वर लोहिरे (वय २१, रा. जिजामातानगर, लोणावळा) व प्रकाश कवेंदर शेट्टी (वय ३५, रा. सह्याद्री हाइट्स, भांगरवाडी, लोणावळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जोवणगाव येथील बाबू वाघू गोणते, आबू बाबू गोणते यांच्याकडून जमीन गट क्रमांक १७६ मधील १ हेक्टर ४४
आर जागा मुंबई (बांद्रा) येथे राहणारे महेंद्र पी. बहल व त्यांची पत्नी किरण एम. बहल यांनी १२ एप्रिल १९९०ला खरेदी केली होती. दस्तनोंदणी क्रमांक १७२३/१९९० नुसार खरेदीखताची गाव तलाठी कार्यालयाच्या दप्तरी नोंद झाली. तेव्हापासून जागेची ताबेवहिवाट बहल यांच्याकडे होती. बहल हे मुंबईत व्यवसाय करीत असल्याने त्यांना कामाच्या व्यापामुळे जागेकडे लक्ष देता आले नाही. याचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून जागेचे बनावट दस्त केले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी अविनाश सुळे याच्या घराची झडती घेतली असता, त्यांना मूळ जमिनीचे बनावट दस्त क्र. ६५३१/१६ मिळून आले. आणखी काही कागदपत्रे हाती लागण्याची शक्यता आहे. ही कागदपत्रे हाती लागल्यास या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध घेणे शक्य होणार आहे, असे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.

शासकीय अधिकाऱ्यांची दलालांना साथ
जमीन गैरव्यवहाराच्या या प्रकरणात आरोपींना शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साह्य केले असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे यांच्या पथकाने आरोपी अविनाश सुळे याच्या लोणावळ्यातील घराची झडती घेतली असता, जमिनीचे मूळ कागदपत्र आढळून आले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन जामिनावर सोडण्यात आले. या गैरव्यवहारात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असून, लवकरच फरारी आरोपींनाही ताब्यात घेऊ, असे गिझे यांनी सांगितले.

असा केला जमिनीचा गैरव्यवहार
मुंबईतील बहल दाम्पत्याच्या जागी बोगस व्यक्ती उभ्या करून त्या जागेचे दस्त केले. दस्त क्र. ४९११/१२०१४ अन्वये वैष्णव बळीराम गायकवाड याच्या नावावर ही जागा नोंदवली गेली. ५ नोव्हेंबर २०१६ ला लोणावळ्यातील अविनाश सुळे यांनी तीच जागा इतरांच्या मदतीने वैष्णव गायकवाड हे नाव पुढे करून दस्त क्र. ६५३१/२०१६ नुसार हस्तांतरित केली. पवन मावळातील वाघेश्वर येथे राहणारे संतोष भाऊसाहेब कडू यांना या जागेची विक्री करण्यात आली. खरेदीखत दस्त क्र. १२६०/२०१७ नुसार २६ एप्रिल २०१७ ला तयार केले. त्यास सुळे यांनी मान्यता दिली. हे दस्त तयार करताना साक्षीदार म्हणून संगमेश राकेश अयप्पा (रा. लोणावळा, भांगरवाडी) व मोहम्मद शेख यांची सही घेतली. त्यानंतर एकाच भूखंडाची परस्पर अनेकदा विक्री व्यवहार झाला. याप्रकरणी बहल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Five suspects in plot fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.