पश्चिम रेल्वेवर १५ दिवसांत पाच धमकीची पत्रे !
By admin | Published: November 19, 2015 02:26 AM2015-11-19T02:26:37+5:302015-11-19T08:26:22+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी पत्रे रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी पत्रे रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली आहेत. त्याची गंभीर दखल घेत, त्याचा तपास करतानाच सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गुजरातमधील तीन स्थानकांवर सुरुवातीला ही पत्रे आली. नवसारी स्थानकाच्या स्टेशन अधीक्षकांना ३0 आॅक्टोबर मिळालेल्या पत्रात राजधानी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस आणि आॅगस्ट क्रांती एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. याची गंभीर दखल घेत, सर्व गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी बार्डोली स्टेशन अधीक्षकांना रेल्वे स्थानक व बस स्थानक उडविण्याचे धमकी पत्र मिळाले.
हे पत्र मिळाल्यानंतर १0 नोव्हेंबरला राजकोट येथील रेल्वे सुरक्षा दलाला कविगुरु एक्सप्रेस उडविण्याची, तर मंगळवारी नवसारी स्थानकात ओखा-वांद्रे टर्मिनस, बिकानेर-वांद्रे टर्मिनस आणि पश्चिम एक्सप्रेस या गाड्या उडविण्याची धमकी देणारे पत्र आले. या पत्राखाली आतंकवाद जिहाद सिमी अशी सही आहे. बुधवारीही वांद्रे स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात कटरा-हापा, अहमदाबाद-दरभंगा आणि फिराजपूर जनता एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे धमकी देणारी पत्रे आली आहेत.
ही पत्रे प्राप्त झाल्यानंतर स्थानकांवरील सुरक्षा वाढविण्यात आली असून गाड्यांची आणि स्थानकांची तपासणी करण्यात येत आहे.
- शरत चंद्रायन (पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)