बारामतीमधून पाच टॉपर; बॉटमवर नागपूरची हॅट्ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:56 AM2019-03-28T01:56:58+5:302019-03-28T01:57:18+5:30
आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये प्राप्त मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ९ टॉपर काँग्रेसचे, ३ टॉपर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपा, शिनसेना, शेकाप व पीएसपी या पक्षांचा प्रत्येकी एक विजयी उमेदवार टॉपर ठरला.
- प्रेमदास राठोड
आजवरच्या लोकसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातून कोणता विजेता होणार मतदानाच्या टक्केवारीत टॉपर आणि कोण गाठणार तळ ? आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये प्राप्त मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ९ टॉपर काँग्रेसचे, ३ टॉपर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपा, शिनसेना, शेकाप व पीएसपी या पक्षांचा प्रत्येकी एक विजयी उमेदवार टॉपर ठरला. बारामतीने आजवर ५ टॉपर दिले. कराडने निवडलेले चार उमेदवार टॉपर ठरले तर साताऱ्याने दोन टॉपर दिले. इतर पाच मतदारसंघांनी एक-एकदा टॉपर दिले. १९९८ ते २००९ अशा लागोपाठ चार निवडणुकांमध्ये सतत टॉपर देण्याची बारामतीची घोडदौड २०१४ मध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांनी रोखली होती. शेट्टी यांना त्यावेळी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मते मिळाली तर रायगडमधून बाजी मारलेले शिवसेनेचे अनंत गीते यांना सर्वांत कमी ४०.११ टक्के मते पडली होती. विशेष म्हणजे हेच गीते १९९६ च्या निवडणुकीत ५८.५४ मतांसह राज्यात टॉपर होते.
बारामतीने लागोपाठ चार निवडणुकांमध्ये टॉपर दिले. २००९ मध्ये बारामतीमधून विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक ६६.४६ टक्के पडली होती. त्यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये शरद पवार टॉपर होते. १९९८ मध्ये पवार यांना सर्वाधिक ६५.८१ टक्के, १९९९ मध्ये सर्वाधिक ५७.७८ टक्के तर २००४ मध्ये शानदार ७१.०३ टक्के मते मिळाली होती. त्यापूर्वी १९९६ मध्ये अनंत गीते यांनी ब्रेक लावला नसता तर लागोपाठ सहावेळा टॉपर देण्याचा विक्रम बारामतीने नोंदवला असता. कारण १९९१ च्या निवडणुकीत बारामतीत ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार टॉपर ठरले होते. अजित पवार यांचा ७५ टक्के मतांचा विक्रम गेल्या ६ सार्वत्रिक निवडणुकांत कोणालाही मोडता आलेला नाही. सर्वाधिक तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यातून मतांच्या सर्वांत कमी टक्केवारीसह उमेदवारांना विजयी करण्याचा विक्रम नागपूरच्या नावावर आहे. १९६२ मध्ये अपक्ष बापूजी अणे (४०.५३ टक्के), १९७१ मध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे (३७.०९ टक्के) आणि १९७७ मध्ये विजयी झालेले काँग्रेसचे गेव्ह आवारी (४४.५५ टक्के) हे तिघे मतदानाच्या टक्केवारीत राज्यात सर्वांत मागे होते. प्राप्त मतांच्या टक्केवारीत त्या-त्या निवडणुकीत राज्यातून टॉपर ठरलेले इतर विजयी उमेदवार : प्रतापराव भोसले (१९८९ सातारा ८१.९४ टक्के), प्रेमलाबाई चव्हाण (१९८४ कराड, ८३.०९ टक्के), उषाताई चौधरी (१९८० अमरावती, ७१.६८ टक्के), यशवंतराव चव्हाण (१९७७ सातारा, ७६.३८ टक्के), साताऱ्यातून लागोपाठ तीनदा दाजीसाहेब चव्हाण (१९७१ मध्ये ८६.२६ टक्के, १९६७ मध्ये ७४.६९ टक्के व १९६२ मध्ये ७१.४९ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर ८०.६५ टक्के) आणि नारायणराव वाघमारे (१९५१ परभणी, ६६.०१ टक्के).