राज्यात उष्माघाताचे पाच बळी; ३०० रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:40 AM2019-06-06T02:40:48+5:302019-06-06T02:41:00+5:30
प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते.
मुंबई : सध्या सूर्य आग ओकत असल्यामुळे राज्यात मार्च महिन्यापासून आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यातील औरंगाबादच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे, तर उर्वरित चार जणांचा मृत्यूही उष्माघातानेच झाल्याचा संशय असून, त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते. त्यामुळे घाम येत नाही आणि शरीराचे तापमान वाढत जाऊन ती व्यक्ती बेशुद्ध होते. त्यानंतर कोमामध्ये जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. घडणाऱ्या या प्रकाराला साधारणत: ‘उष्माघात’ असे म्हणतात. विशेषकरून विदर्भ-मराठवाडा येथे याचा जास्त प्रादुर्भाव आहे, अशी माहिती उष्माघात नियंत्रण कक्षाचे डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले रुग्ण, लहान बालके यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. उष्माघाताचे गांभीर्य लक्षात घेता यासंदर्भातील प्राथमिक लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. भोई यांनी केले आहे.
राज्यात गेल्या अडीच महिन्यांत उष्माघाताच्या ३०० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १६० उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी काही जणांवर उपचार सुरू आहेत, तर काही उपचाराअंती बरे झालेले आहेत. यामध्ये लातूर १६, अकोला ३६, अमरावती ११, बुलडाणा २, नागपूर जिल्हा २९, नागपूर शहर ५८ असे एकूण १६० रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी नागपूर शहर आणि जिल्हा मिळून ८७ रुग्ण हे नागपूरमधील आहेत.