पदवी प्राप्त करण्यासाठी आता पाच वर्षांची मर्यादा
By admin | Published: October 23, 2015 01:58 AM2015-10-23T01:58:40+5:302015-10-23T01:58:40+5:30
पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मर्यादा घातल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालावधीतच पदवी प्राप्त करावी लागणार आहे.
पुणे : पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मर्यादा घातल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालावधीतच पदवी प्राप्त करावी लागणार आहे. पदवीच्या कालावधीपेक्षा अधिकची केवळ दोन वर्षे दिली जातील. अन्यथा पुन्हा पहिल्या वर्षाला प्रवेश घ्यावा लागेल.
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही विद्यापीठांकडून बराच कालावधी दिला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे तीन वर्षांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी सहा वर्षांची मुदत दिली जात होती, तर चार वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आठ वर्षे कालावधी दिला जात होता. अभ्यासक्रमांच्या कालावधीत एकसंधता यावी यासाठी आता विद्यापीठांच्या नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीव्यतिरिक्त पदवी प्राप्त करण्यासाठी केवळ दोन वर्षांचा अधिकचा कालावधी दिला जाणार आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांना यूजीसीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मिळेल त्या वेळेत अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्षांचे बंधन पाळावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या कालावधीत पदवी प्राप्त करणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने संबंधित अभ्यासक्रमाचे सर्व विषय घेऊन परीक्षा द्यावी लागेल.
परिणामी पुढील काळात बी. ए., बी.कॉम., बी.एस्सी. हे तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांतच पूर्ण करावे लागतील. अभियांत्रिकीसारखी पदवी सहा वर्षांत पूर्ण करावी लागेल. अपवादात्मक स्थितीत विद्यापीठएखाद्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा कालावधी वाढवून देऊ शकेल, अशीही तरतूद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या कालावधीबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठांना परीक्षांच्या कालावधीसंदर्भात निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे.
- डॉ. अशोक चव्हाण,
परीक्षा नियंत्रक,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ