विकास मंडळांना पाच वर्षे मुदतवाढ
By admin | Published: May 2, 2015 01:04 AM2015-05-02T01:04:08+5:302015-05-02T01:04:08+5:30
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे.
कमल शर्मा, नागपूर
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केलेली शिफारस मान्य करून राष्ट्रपतींनी ३० एप्रिल २०२०पर्यंत मुदतवाढ दिली.
विकास मंडळांची मुदत ३० एप्रिलपर्यंतच होती. त्यामुळे गुरुवारी सर्वांच्या नजरा राज्यपालांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास राजभवनातून संदेश प्राप्त झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या सचिवांनी विदर्भ विकास मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनुपकुमार यांना दूरध्वनीवरून कार्यकाळ विस्ताराची माहिती दिली. त्यामुळे आता विकास मंडळ ५ वर्षांपर्यंत कार्यरत राहील. राज्यपालांचे विशेषाधिकारही कायम ठेवण्यात आले आहेत.
यापूर्वी २०१०मध्ये मंडळाच्या कार्यकाळ विस्तारावरून संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ३० एप्रिल २०१० रोजी तीनही मंडळांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढविला होता.
याला विदर्भवाद्यांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारने सहा महिन्यांनंतर विदर्भासह ३ मंडळांना ३० एप्रिल २०१५पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवार हा अंतिम दिवस होता.
विदर्भ विकास मंडळाच्या कार्यालयात रात्री ७.३० वाजेपर्यंत ई-मेल तपासले जात होते. फॅक्सवरही अधिकाऱ्यांचे लक्ष होते. राष्ट्रपतींचा आदेश राजभवनातून येणार असल्याने तेथेही संपर्क साधण्यात येत होता.