काकूनेच केला पाच वर्षांच्या पुतण्याचा खून

By admin | Published: March 24, 2017 11:51 AM2017-03-24T11:51:15+5:302017-03-24T14:39:05+5:30

आपल्या घरात मुलीच आहेत.मुलगा नाही मात्र शेजारी राहणाऱ्या लहान जावेला मुलगा आहे.या कारणामुळे कायम टोचून बोलले जायचे.

Five years old murdered murdered murderer | काकूनेच केला पाच वर्षांच्या पुतण्याचा खून

काकूनेच केला पाच वर्षांच्या पुतण्याचा खून

Next

ऑनलाईन लोकमत

पुणे, दि. 24 - पोटी मुलगा नसल्याच्या वैफल्यातून एका महिलेने पाच वर्षीय पुतण्याचा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह पाण्याच्या प्लास्टीकच्या पिंपात लपवून ठेवल्याची घटना हडपसर परिसरात घडली. मुलगा हरवल्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना आणि कुटुंबियांना या महिलेने ताकास तुर लागू दिली नाही. मात्र, या महिलेने स्वत:च केलेल्या एका फोन कॉलमुळे तिचा गुन्हा उघडकीस आला. हडपसर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. 
 
माऊली विनोद खांडेकर (वय ५, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिता शाम खांडेकर (वय 32, रा. काळेपडळ) हिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील काळेपडळमध्ये एसआरएची स्किम आहे. या इमारतीमध्ये राम खांडेकर, शाम खांडेकर आणि विनोद खांडेकर हे तिघे सख्खे भाऊ वेगवेगळ्या सदनिकांमध्ये राहण्यास आहेत. तिघांचेही लग्न झालेले असून राम आणि शाम यांना मुली आहेत. अनिता ही शामची पत्नी असून तिला दोन मोठ्या मुली आहेत. तर विनोद यांना माऊली हा मुलगा होता. राम यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तर श्याम खासगी दुकानात काम करतात. विनोद यांचा स्वतःचा टेम्पो असून ते तो स्वतःच चालवतात.
 
अनिताला मुलीच असल्यामुळे सासू तिला नेहमी टोचून बोलायची. त्यावरुन अनेकदा दोघींमध्ये वादही होत होता. आपल्या धाकट्या जावेला मुलगा आहे; त्यामुळे आपल्या मुलींचे कोडकौतुक व लाड होत नाहीत असे तिला सतत वाटत होते. तसेच सासूचा नेहमी पाठीमागे त्रास असल्यामुळे तिने माऊलीचा खून करण्याचा कट आखला. गुरुवारी तिने माऊलीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह घरातील कॉटखाली दडवून ठेवला.
 
दरम्यान, बराच वेळ मुलगा घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु झाली होती. त्याच्या पालकांनी पोलिसांकडे मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरी येऊन चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा आपल्याला पुतण्या हरवल्याचे खुप दु:ख झाल्याचे नाटक करीत तिने रडायला सुरुवात केली. प्राथमिक तपासानंतर पोलीस आणि नातेवाईक शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा तिने माऊलीचा मृतदेह घराच्या मागे असलेल्या पाण्याच्या प्लास्टीक पिंपामध्ये टाकला. मात्र, पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करीत अनिताने रचलेला बनाव उघडा पाडला. तिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. 
 
असा उघडकीस आला गुन्हा
1) माऊलीची शोधाशोध सुरु असतानाच विनोद खांडेकर यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. फोनवर एक महिला बोलत होती. तिने माऊली एसटी बसने जेजुरीला आला असून तो जेजुरी बस स्थानकावर माझ्यासोबत असल्याची बतावणी करीत त्याला घेऊन जाण्यासंदर्भात कळवले. पोलीस आणि विनोद जेजुरी बसस्थानकावर गेले तेव्हा तेथे बराच वेळ शोध घेऊनही कोणीच दिसले नाही. शेवटी  ‘त्या’ मोबाईल क्रमांकावर कॉल करण्यात आला. मात्र, हा मोबाईल बंद लागत होता. पोलिसांनी मग या मोबाईल क्रमांकाची सर्व माहिती काढायला सुरुवात केली. 
 
2) तो मोबाईल क्रमांक भास्कर बोक्षे या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समजताच त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. बोक्षे यांनी हा क्रमांक त्यांची मुलगी स्वाती बु-हा ही वापरत असल्याचे सांगितले. भास्कर यांच्या दोन्ही मुली काळेपडळ येथील एसआरएमध्ये राहण्यास असल्याचे पोलिसांना समजले. स्वाती यांच्याकडे चौकशी केली असता हे सीमकार्ड दोन महिन्यांपुर्वी चोरीला गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 
 
3) पोलिसांनी या सीमकार्डवरुन किती कॉल झाले आहेत त्याची माहिती काढली. दोन महिन्यात एकूण नऊ फोन कॉल झालेले होते. या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये नेमका अनिताचा भाऊही होता. हे सीम कार्ड अनिताच वापरत असल्याचे समोर येताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच तिने खुनाचा गुन्हा कबूल केला.

Web Title: Five years old murdered murdered murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.