दहा दिवसांत पात्रता निश्चित करा - मुख्यमंत्री
By admin | Published: May 12, 2017 03:23 AM2017-05-12T03:23:54+5:302017-05-12T03:23:54+5:30
जोगेश्वरी रेल्वेच्या हद्दीतील तोडण्यात आलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची दहा दिवसांमध्ये पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोगेश्वरी रेल्वेच्या हद्दीतील तोडण्यात आलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची दहा दिवसांमध्ये पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिले.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. इंदिरानगर झोपडपट्टीतील सुमारे १२० झोपड्या तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. झोपड्या रेल्वेच्या हद्दीत असल्या तरी, राज्य शासनाचे २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे धोरण आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या धोरणानुसार येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी केली. त्यानुसार, दहा दिवसांत इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पात्र तसेच अपात्र झोपडीधारकांची यादी तयार करून ती एमएमआरडीएला सादर करावी. यादी मिळाल्यावर एमएमआरडीएने चेंबूर माहुल येथील त्यांच्याकडील सदनिका तात्पुरत्या स्वरूपात इंदिरानगरच्या रहिवाशांना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या वेळी आरे वसाहतीतील नागरी सुविधांच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. आदिवासी तसेच बिगर आदिवासींच्या पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे तसेच झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.