बनावट नोटांचा सुळसुळाट
By admin | Published: April 5, 2017 01:06 AM2017-04-05T01:06:26+5:302017-04-05T01:06:26+5:30
चाकण आणि परिसरात नव्याने उदयास येणाऱ्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला
आंबेठाण : चाकण आणि परिसरात नव्याने उदयास येणाऱ्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. नोटाबंदी झाल्यानंतर नवीन स्वरूपाच्या नोटा चलनात आल्या. नवीन आलेल्या नोटाबाबत सर्वसामान्य आणि अशिक्षित नागरिकांना फारशी माहिती नसल्याने अनेक ठकांकडून त्यांना बनावट नोटा देऊन गंडविले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे.
अनेक ठिकाणी तर खऱ्या नोटांच्या कलर झेरॉक्स काढून त्या व्यवहारात आणल्या जात आहेत. अशा प्रकारे तयार केलेल्या बनावट नोटा व्यवहारात आणण्यासाठी भाजीपाला घेऊन बसणारे लहान व्यावसायिक, हॉटेल, ढाबे चालक, पेट्रोल पंप,गावठी दारूची ठिकाणे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बनावट नोटा चालविल्या जात आहेत.
ग्रामीण भागात तर शेतमजूर म्हणून कामाला येणाऱ्या अडाणी लोकाना देखील बनावट नोटा दिल्याचे प्रकार घडले आहेत. याशिवाय अशा प्रकारच्या बनावट नोटा चालण्याचे हमखास ठिकाण म्हणजे गावोगावी चालणाऱ्या भिशी. ग्रामीण भागात देखील त्याचे प्रमाण मोठे आहे. अशाच ठिकाणी बनावट आणि कधी झेरॉक्स काढून आणलेल्या नोटा बंडलामधून चालविल्या जात आहेत. बहुतांश ठिकाणी भिशी या रात्रीच्या वेळी होत असल्याने आणि अशा वेळी भिशी लवकर उरकावी म्हणून अनेक वेळा केवळ बांधलेली बंडले पाहून नोटा घेतल्या जात असतात.
असाच एक प्रकार औद्योगिक वसाहतीच्या भागात घडला होता. तेथे एका स्थानिक युवकाकडून ओळखीच्या परप्रांतीय युवकाने काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे पुन्हा फिरवताना जवळपास निम्या नोटा या बनावट दिल्या होत्या. परंतु आपली फसवणूक झाली तरी पोलिसांचे लचांड नको म्हणून तक्रार दिली नाही.
पंधरा वीस दिवसातून अशा प्रकारे बनावट नोटा व्यवहारात येऊन कोणाची तरी फसवणूक झाल्याच्या घटना ऐकावयास मिळत आहेत.