‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:31 IST2025-02-25T06:31:36+5:302025-02-25T06:31:50+5:30

मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए, ओएसडीसुद्धा ठरवतात. त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेले नाही, असे कोकाटे यांनी सोमवारी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.

'Fixer' will not be given to NEM; Chief Minister Devendra Fadnavis reprimands Agriculture Minister Manikrao Kokate | ‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले

‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहीत नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांना नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा ‘फिक्सर’ लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए, ओएसडीसुद्धा ठरवतात. त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेले नाही, असे कोकाटे यांनी सोमवारी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे महायुतीमधील मंत्र्यांना काहीच अधिकार नसल्याची चर्चा सुरू झाली. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, मी कॅबिनेटमध्ये सांगितले होते तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण ‘फिक्सर’ म्हणून ज्यांच्या नावांची चर्चा आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्या नावांना मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तरी मी त्या नावांना मान्यता देणार नाही. माझ्याकडे आलेल्या १२५ प्रस्तावांपैकी मी १०९ नावांना मंजुरी दिली आहे.

मंत्र्यांविरोधातील तक्रारींची चौकशी
काही मंत्र्यांविरोधात असलेल्या तक्रारीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, तक्रार आली म्हणजे काही गैरप्रकार झालाच असेल असे नाही, तरी आलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जात आहे.
वीजदरवाढीबाबत जाणीवपूर्वक संभ्रम पसरविला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: 'Fixer' will not be given to NEM; Chief Minister Devendra Fadnavis reprimands Agriculture Minister Manikrao Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.