वाहनांच्या खरेदीसाठी झुंबड
By admin | Published: April 1, 2017 04:08 AM2017-04-01T04:08:29+5:302017-04-01T04:08:29+5:30
बीएस-३ मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात
मुंबई : बीएस-३ मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांकडून ३१ मार्चपर्यंत मोठी सवलत वाहन खरेदीवर देण्यात आल्याने, ग्राहकांची एकच झुंबड मुंबईसह राज्यातील शोरूममध्ये उडाली. मात्र, या मानांकातील वाहनांचा साठा काही शोरूममध्ये संपल्याने, ग्राहकांंना निराश होऊनही परतावे लागले. महत्त्वाची बाब म्हणजे, बीएस-३ वाहनांची नोंदणीही काही आरटीओंमध्ये करण्यात आली. त्यामुळे दररोज होणाऱ्या वाहन नोंदणीपेक्षा तीन पटीने वाहन नोंदणीत वाढ झाली. त्यामुळे आरटीओंनाही चांगलाच महसूल मिळाला आहे.
वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यामुळे प्रदूषण करणारे बीएस-३ इंजिनावर बंदी घालत, १ एप्रिलपासून बीएस-४ इंजिन असणाऱ्या वाहनांची खरेदी-विक्री करण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे वाहन कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत बीएस-३ इंजिन असलेली वाहने २0 ते ३0 टक्के सवलत देऊन विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डीलर्सकडून शोरूम १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले. वाहने स्वस्त दरात विकली जात असल्याने, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांतील शोरूममध्ये या मानांकातील वाहनांची मागणी वाढली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसह अन्य काही शहरातील शोरूममध्ये वाहन ग्राहकांची एकच झुंबड उडाली. होंडा, टीव्हीएस या कंपन्यांच्या दुचाकींसह काही कंपन्यांच्या चारचाकी वाहनांना चांगलीच मागणी होती. दुचाकींवर पाच हजारांपासून २0 हजारांपर्यंत, तर चारचाकी वाहनांवर २५ हजारापासून ते ७५ हजारांपर्यंतची सवलत देण्यात होती. त्यामुळे काही शोरूममध्ये बीएस-३ मानांकन असलेली जवळपास २५0 ते ५00 वाहने विकली जात होती. काही शोरूममध्ये याच मानांकातील वाहने कमी उपलब्ध असल्याने, ती वाहने दुपारपर्यंत संपल्यानंतरही त्या शोरूममध्ये ग्राहकांकडून विचारणा होत होती. मात्र, वाहन उपलब्ध नसल्याने, निराश होऊन अन्य शोरूममच्या शोधात ग्राहक फिरत होते. (प्रतिनिधी)
रोज आठ ते नऊ हजार वाहनांची नोंद होते. ३१ मार्च रोजी मात्र, वाहन नोंदणीत ३ पटीने वाढ झाली. बीएस-३ वाहनांची खरेदीही ३१ मार्चपर्यंत केल्यानंतर, ज्यांची नोंदणी राहिली असेल, अशा वाहनांची नोंदणी १ एप्रिलनंतर होईल. जेथे गरज पडेल, त्या आरटीओंना नोंदणीसाठी थोडे जास्त काम करण्याच्या सूचना करण्यास सांगितले आहे.
- प्रवीण गेडाम, राज्य परिवहन आयुक्त
‘बीएस-४’चीही नोंदणी
वाहनांची तात्पुरती नोंदणीही करता येऊ शकते. त्याप्रमाणे, काही आरटीओत बीएस-३ वाहनांची घाईघाईने तात्पुरती नोंदणीही करण्यात आली, तर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने, बीएस-४ वाहनांचीही नोंदणी बरीच झाल्याचे सांगण्यात आले.