अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:26 PM2024-11-04T20:26:29+5:302024-11-04T20:27:07+5:30
Raj Thackeray In Dombivli : "ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय?"
मला, आज आत्ताच कुणीतरी एक क्लिप पाठवली. मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावर एका भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय. लोक येण्याआधी आणि लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एक बाई नाचतेय. तेही कुठल्यातरी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ज्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, संबंधित उमेदवाराचं नाव आहे, त्यावर एक महिला भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ही लाडकी बहीण योजना? असा सवाल करत, ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय? अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते डोंबिवलीत राजू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत बोलत होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आपण कुठे चाललो आहोत. या असल्या प्रकारच्या व्यासपीठावर, अशा प्रकारच्या मुली आणून, अशा प्रकारच्या गाण्यांवर नाचवायची पद्धत, हे सर्व युपी, बिहार, त्या बाजूला. हे आपल्याकडे कधीच नव्हतं. हे आपल्याकडे सुरू झालं आता. आपल्याकडच्या राजकीय व्यासपीठांवर, अशा प्रकारे मुली नाचवायला आणायला लागलो आता. मला वाटतं, यात एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीक लक्ष घालायला हवे. हे कुणाचे डोके आहे? आहे? म्हातारी मेल्याचं दुःनाही काळ सोकावतो."
...अन् आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय -
"आपल्यासाठी, या असल्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्र वाचवणे सर्वात महत्वाचे आहे. शिवसेना असूदेत, राष्ट्रवादी काँग्रेस असूदेत, भाजपा असूदेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असूदेत, या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कुठला पक्ष टिकला, नाही टीकला, काही फरक पडत नाही. महाराष्ट्र टिकायला हवा. महाराष्ट्र बरबाद होता कामा नये. जर महाराष्ट्र बरबाद झाला, तर यांचं नाव नाही घेता येणार आपल्याला. ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने, हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय..." असे म्हणत राज ठारे यांनी संताप व्यक्त केला.
...म्हणून एकदा तुम्ही माझ्या हाती सत्ता देऊन बघा -
महाराष्ट्रातील एवढे सारे प्रश्न प्रलंबित असताना, चेष्टा चालू आहे, थट्टा चालू आहे, मस्करी चालू आहे, मजा चालू आहे. आज मी सहज तुम्हाला हलवायला आलो होतो की, जागे आहातना, जिवंत आहातना. येथे माझी पुन्हा एकदा 15 तारखेला सभा आहे. तेव्हा इतरही गोष्टींवर बोलेनच. बाबानो तुम्हाला माझे एवढेच सांगणे आहे की, महाराष्ट्रासाठी जागे रहा, जिवंत राहा. मी या महाराष्ट्रासाठी तळमळीने काम करतोय. मी माझ्या पहिल्या सभेत सांगतिले होते की, जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच इच्छा आहे. म्हणून माझ्या हाती तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा. या इच्छेपोटीच मी ही निवडणूक लढवतोय, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.