शौचकुपात अडकलेला पाय आठ तासांनी मोकळा

By Admin | Published: December 11, 2015 11:12 PM2015-12-11T23:12:20+5:302015-12-11T23:50:19+5:30

कोकण रेल्वेतील प्रकार : कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीमधील वृद्धेचे हाल, डब्याचा पत्रा कापला

Flee tightly after eight hours | शौचकुपात अडकलेला पाय आठ तासांनी मोकळा

शौचकुपात अडकलेला पाय आठ तासांनी मोकळा

googlenewsNext

रत्नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेसच्या प्रसाधनगृहात एका महिलेचा पाय अडकल्याने निर्माण झालेल्या संकटावर तब्बल आठ तासांनंतर मात करण्यात कोकण रेल्वेला यश आले. रत्नागिरी स्थानकात रेल्वे आल्यानंतर प्रसाधनगृहातील शौचकुपीच्या चारही बाजूने पत्रा कापून या महिलेला प्लॅटफॉर्मवर आणले गेले. पायाला दुखापत होणार नाही, याची काळजी घेत कटरने पत्रा कापून महिलेचा पाय सुुखरुप बाहेर काढण्यात आला. रुबियाबी शेख (६८, घाटकोपर, मुंबई) असे या महिलेचे नाव असून, तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुबियाबी शेख ही महिला ठाणे ते करमाळी असा प्रवास करीत होती. खेडमध्ये रेल्वे आली असता प्रसाधनगृहात गेलेली ही वृध्द महिला घसरून पडली. त्यामुळे तिचा पाय प्रसाधनगृहाच्या पाईपमध्ये गेला आणि अडकला. त्यानंतर तिकीट तपासनीस, कोच अटेंडंट तसेच प्रवाशांनी तिला उचलून तिचा पाय बाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर तिच्याबरोबर प्रवास करीत असलेले पती कासम शेख यांनी रेल्वेकडे मदत मागितली. प्रशासनाने मदतीसाठी चक्र हलवली. सकाळी साडेसात वाजल्यानंतर रेल्वे रत्नागिरीत आली. रेल्वेचे विभागीय प्रबंधक बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्षात तिला वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी तसेच रत्नागिरी नगरपरिषद अग्नीशमन विभागाचे कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. महिलेचा पाय सुजल्याने प्रसाधनगृहाच्या पत्र्याच्या पाईपमध्ये अधिकच घट्ट बसला. परिणामी तिला उचलून बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे कटरच्या सहाय्याने प्रसाधनगृहातील शौचकूूपाच्या चारही बाजूने पत्रा कापण्यात आला व त्यासह महिलेला प्लॅटफॉर्म क्रमांक २वर आणले गेले. पायात अडकलेला प्रसाधनगृहातील शौचकुपाचा पाईप कटरने कापायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. तसे केले तर महिला जखमी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाईपच्या आतून मेटल प्लेट टाकली. त्यावरून कटरने पाईप कापण्यात आला व महिलेचा पाय बाहेर काढण्यात आला. त्यावेळी दुपारचे साडेबारा वाजले होते. (प्रतिनिधी)

ती बोगी रत्नागिरीतच...
महिलेचा प्रसाधनगृहाच्या पाईपमध्ये अडकलेला पाय बाहेर काढण्याच्या कामाला वेळ लागणार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसची एस १० ही बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. आतील प्रवाशांना दुसऱ्या बोगीत बसवण्यात आले. त्यानंतर कोकणकन्या मडगावकडे रवाना झाली.


वृध्देच्या धीटाईला सलाम...
एवढा भयावह प्रसंग असूून व जीवावर बेतलेले असतानाही प्रसाधनगृहात अडकलेली वृध्द महिला रुबियाबी मात्र धीराने सर्व स्थितीला सामोरी जात होती. प्रचंड संयम तिच्यात दिसून येत होता. या सर्वातून सहीसलामत सुटका होणार, याबाबतचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती कुठेही डगमगली नाही. उलट पाईप कटरने कापणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती सहकार्य करीत होती. तिच्या धीटाईला कर्मचाऱ्यांनीही सलाम ठोकला.

Web Title: Flee tightly after eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.