पलायन करणाऱ्या आरोपीचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2016 09:27 PM2016-05-06T21:27:18+5:302016-05-06T21:48:01+5:30
आरोपीसोबत असणाऱ्या दोन पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी मारली. आरोपीसोबत त्यांची सुरू असलेली झटापट पाहून प्रसंगावधान राखत नागरिकांनी दोन्ही पोलिसांना बाहेर काढले.
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 6- ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करून पुन्हा सावंतवाडीतील कारागृहात नेले जात असताना आरोपी नंदकिशोर बाबूराव सावंत (वय. ३३, रा. कुडाळ) याने पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन येथील मोती तलावात उडी टाकली. यावेळी आरोपीसोबत असणाऱ्या दोन पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी मारली. आरोपीसोबत त्यांची सुरू असलेली झटापट पाहून प्रसंगावधान राखत नागरिकांनी दोन्ही पोलिसांना बाहेर काढले. परंतु आरोपी सावंत याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
आरोपीला वाचवण्यास गेलेल्या दोघा पोलिसांच्या छातीत व पोटात पाणी गेल्याने ते अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुडाळ येथे वडिलांवर पाळ-कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नंदकिशोर सावंत ३१ मे २०१५ पासून सावंतवाडी कारागृहात बंद आहे. पोलिस त्याला प्रत्येक तारखेला ओरोस येथील न्यायालयात हजेरीसाठी घेऊन जात होते. त्याप्रमाणेच शुक्रवारी सकाळी पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवस व कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण हे सकाळी सावंतला ओरोस न्यायालयात घेऊन आले होते. न्यायालयाने २७ मे ही पुढील तारीख दिल्यानंतर आरोपी सावंतला घेऊन पोलीस एसटी बसने सावंतवाडीला आले. बसस्थानकातून आरोपीला घेऊन कारागृहाकडे पायी जात असताना मोती तलावाच्या काठावर आरोपी सावंतने पोलीस प्रदीप चव्हाण यांच्या हाताचा चावा घेतला आणि मोती तलावात उडी मारली. यामुळे दोन्ही पोलीस गांगरून गेले. त्यांनीही तलावात उडी घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीच्या झटापटीत त्यांचाच जीव धोक्यात आला. अखेर प्रसंगावधान राखत नागरिकांनी पोलिसांनी तलावाबाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोती तलावात बुडालेल्या आरोपीच्या शोधासाठी सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमला पाचारण केले.आल्मेडा यांच्या टीमने साडेतीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मोती तलावात शोधाशोध केली. पण आरोपी सावंत उशिरापर्यंत सापडला नव्हता. (प्रतिनिधी)
...................
आरोपी मेकॅनिक इंजिनीअर, मात्र मनोरुग्ण
आरोपी नंदकिशोर सावंत हा उच्चशिक्षित असून मेकॅनिकल इंजिनीअर आहे. मात्र, तो मनोरूग्ण असल्याचे, त्याच्या आईने पोलिसांच्या जबानीत सांगितले आहे.