मुंबईचा सागरीमार्ग मोकळा
By admin | Published: June 9, 2015 04:37 AM2015-06-09T04:37:53+5:302015-06-09T04:37:53+5:30
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई कोस्टल रोड'ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली.
नवी दिल्ली : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई सागरी किनारपट्टी रस्ते बांधणी प्रकल्पाला’ (कोस्टल रोड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली.
आॅगस्टनंतर शक्य तेवढ्या जलदगतीने हा रस्ता पूर्ण करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुमारे ३५.६ किलोमीटरच्या किनारपट्टीला लागून असलेल्या या रस्त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडेल. खार ते वर्सोव्यापर्यंत हा रस्ता भुयारी असेल. १५ जूनला ड्राफ्ट नोटिफिकेशन करण्यात येणार असून, १५ आॅगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत ९१ हेक्टर जमीन हरित क्षेत्र करणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते. सागरी मार्गामुळे या वाहतुकीचा ताण कमी होईल. पर्यावरणाचे संतुलन राखत या प्रकल्पांतर्गत मुंबईत ९१ हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाहीत याची दक्षता राज्य सरकार घेणार आहे. राजधानीतील पर्यावरण भवनात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त यु.एस.मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
—————
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मुंबईकरांना ही भेट आहे. मागील आघाडीच्या सरकारने कोस्टल रोडबाबत पाच वर्षे नुसतीच आश्वासने दिली, पण आमच्या सरकारने पाच महिन्यातं याला मंजुरी दिली. कोस्टल रोड प्रकल्पावर मंत्रालयाची भूमिका सकारात्मक होती. यामुळे मुंबईतील वाहतूकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
----------------
पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकर
देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन येत्या आठवडाभरात मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणू. त्यानंतर काही सूचना आल्या तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण व प्रदूषण कमी होईल तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.- प्रकाश जावडेकरकेंद्रीय पर्यावरण, वने राज्यमंत्री
——————
असा असेल सागरीमार्ग...
> कांदिवली ते नरिमन पॉइंटपर्यंतचा ३५.६ किलोमीटरचा मार्ग
> ४२ हेक्टर समुद्रात भराव
> १० हजार कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित
> उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडणार
> नेदरलॅण्ड सरकारशी तांत्रिक करार
> पाच ते सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार
> ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव
> सागरीमार्गात दोन ठिकाणी आंतरसमुद्री बोगदा तयार करण्यात येईल.
> या प्रकल्पांतर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार