कोल्हापूरच्या वाद्यवृंदाचा अटकेपार झेंडा

By admin | Published: September 5, 2015 12:14 AM2015-09-05T00:14:42+5:302015-09-05T00:14:42+5:30

‘स्वरनिनाद’चा रौप्यमहोत्सव : 'जागो हिंदुस्थानी'चा कार्यक्रम अमेरिकेत सादर

The in-flight flag of the orchestra of Kolhapur | कोल्हापूरच्या वाद्यवृंदाचा अटकेपार झेंडा

कोल्हापूरच्या वाद्यवृंदाचा अटकेपार झेंडा

Next

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटले की, मराठमोळ्या संस्कृतीचे शहर. तमाशा, लावणी अशा लोककलांना या शहराने राजाश्रय आणि लोकाश्रयही दिला. ढोलकीच्या थापावर वाजणाऱ्या संगीताला शिट्ट्यांनी दाद देणाऱ्या कोल्हापुरात देशभक्तिपर गीते, सुगम संगीत अशा दर्जेदार संगीताची मूळं रूजवणारी ‘स्वरनिनाद’ संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
सांगीतिक-सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जपत संगीताची अभिरूची अधिक समृद्ध करणे, अभिजात संगीताचा दर्जा टिकविणे व हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने २१ आॅगस्ट १९८९ रोजी ‘स्वरनिनाद’चा ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ हा प्रारंभीचा कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर कार्यक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी चित्रपट सृष्टीतले भालजी पेंढारकर, यशवंत देव, सुधीर मोघे, दत्ता डावजेकर, जगदीश खेबुडकर यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम सुरू झाले.
देश स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘जागो हिंदुस्थानी’ हा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर लोकसंगीत आणि चित्रपट गीतांवर आधारित ‘देस मेरा रंगीला’ या कार्यक्रमात देशाच्या विविध प्रांतांतील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. याशिवाय ‘लख लख चंदेरी’, ‘ओ पालन हारे’, ‘भजनसंध्या’, ‘गीत गीत बहार’ असे विविधांगी कार्यक्रम सादर करत या संस्थेने कोल्हापुरात दर्जेदार संगीताचे कानसेन निर्माण केले आहे.
दिग्दर्शक सुरेश शुक्ल आणि सुनील सुतार यांच्या संयोजनाखाली संस्थेची सांगीतिक वाटचाल सुरू असून, नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानिमित्त संस्थेने देशभक्तिपर गीतांचा झेंडा अटकेपार रोवला आहे. (प्रतिनिधी)

रसिकांना भावगीत, भक्तिगीत, देशभक्तिपर गीत अशा सगळ्या प्रकारच्या संगीताचा निर्मळ आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही वाटचाल सुरू केली. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता केलेल्या संगीत सेवेने आम्ही खेड्यापाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचू शकलो.
- सुरेश शुक्ल, दिग्दर्शक, स्वरनिनाद ग्रुप

Web Title: The in-flight flag of the orchestra of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.