कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:14 AM2017-11-14T01:14:28+5:302017-11-14T01:15:23+5:30

केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे.

 Flight in the month of Kolhapur; The final stage of the work | कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात

कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात

Next

चिन्मय काळे 
मुंबई : केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळण्याची आशा आहे.
देशातील वापरात नसलेल्या २२५ धावपट्ट्यांचा ‘कनेक्टिव्हिटी’ अंतर्गत उपयोग करण्यासाठी ‘उडान’ योजना केंद्राने आणली. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा यात समावेश आहे. यासाठी ३०० कोटी रुपये राज्य सरकार एमएडीसीमार्फत खर्च करीत आहे.
‘उडान’ योजनेसाठी प्रत्येक विमानतळावर अग्निशमन सेवा सक्षम करण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेची सोय एमएडीसी करेल. त्यासंबंधी एमएडीसीचा केंद्र सरकारशी सामंजस्य करार झाला आहे. या कामांसाठी निधी राज्य सरकार देईल, तर धावपट्टीच्या डागडुजीची कामे संबंधित विमानतळांचे आॅपरेटर करतील, असे एमएडीसीचे कार्यकारी संचालक सी. एस. गुप्ता यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेथील धावपट्टीची डागडुजी पूर्ण झाली असून, एटीआर ४२ किंवा एटीआर ७२ या छोट्या आकाराच्या विमानांची सेवा महिनाभरात सुरू होणार आहे. नाशिक येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे विमानतळ, तसेच जळगाव येथील विमानतळाची डागडुजीदेखील जवळपास पूर्ण झाली आहे.
नवीन विमानांचा नवीन तळ-
‘उडान’साठी एअर डेक्कन कंपनी राज्यात सेवा देणार आहे. यासाठी छोट्या १९ आसनी ‘बीचक्राफ्ट १९००डी’ विमानाचा उपयोग केला जाईल. मुख्य म्हणजे, मुंबई विमानतळावर जागा नसल्याने या विमानांचा तळ कोल्हापूर, नाशिक किंवा जळगावला उभा होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Flight in the month of Kolhapur; The final stage of the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.