पुणे विमानतळावरून नागपुर, नाशिकसह नऊ शहरांसाठी होणार उड्डाण; काही कंपन्यांची तिकीट बुकींगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:44 PM2020-05-22T22:44:05+5:302020-05-22T22:45:06+5:30
दोन महिन्यानंतर होणार २५ मेला पहिले उड्डाण
पुणे : लॉकडाऊनमुळे दोन महिने ठप्प असलेल्या पुणेविमानतळावरून नागपुर व नाशिकसह नऊ शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी काही विमान कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावांना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी तिकीट बुकींगला सुरूवातही केली आहे.
देशातील विमानसेवा दि. २५ मे पासून सुरू होत आहे. पुणे विमानतळही त्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. लॉकडाऊन पुर्वी पुणे विमानतळावरून दररोज किमान १५० विमानांची ये-जा होत होती. पण दि. २५ मार्चपासून ही सेवा पुर्णपणे ठप्प आहे. आता दोन महिन्यांनी ही सेवा सुरू होत असली तरी काही ठराविक शहरांसाठी खुली केली जाणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्यडीजीसीएह्णने पुणे निमानतळावरून नाशिक, नागपुर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू, जयपुर, कोची व अहमदाबाद या शहरांसाठी विमानांचे उड्डाण होईल. एअर इंडिया, इंडिगो, गो एअर, एअर एशिया अलायन्स, स्पाईस जेट आणि विस्तारा या विमान कंपन्यांकडून ही सेवा सुरू केली जाणार आहे. यातील काही कंपन्यांनी तिकीट बुकींगही सुरू केले आहे.
विमानतळावरून केवळ ३० टक्केच उड्डाण होणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरून उन्हाळी हंगामात दररोज सुमारे १२५ विमानांची ये- जा होत होते. पण केंद्र सरकारने केवळ ३० टक्के विमान उड्डाणांनाच परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून निवडक शहरांसाठीच ही सेवा सुरू होणार आहे.
---------------------
पुणे रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्यांतर्गत एसटी तसेच रेल्वे प्रवासाला राज्य शासनाने बंदी घातली आहे. पण आता पुण्यातून नाशिक व नागपुरसाठी विमानसेवेला परवानगी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारकडून याबाबत काय भुमिका घेतली जाणार, हे पाहावे लागेल.