हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

By वसंत भोसले | Published: August 11, 2019 05:47 AM2019-08-11T05:47:13+5:302019-08-11T05:47:18+5:30

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

Flood is Kolhapur & Sangli is not only natural | हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

googlenewsNext

- वसंत भोसले
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनतेला हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. याउलट मानवाच्या असंख्य चुका निसर्गाने वारंवार दाखवून देऊनही त्यात सुधारणा करण्याची कोणाची तयारी नाही. त्याचाच फटका निसर्गाने पुन्हा एकदा दिला आहे, हे स्पष्ट होते आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला या महापुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. यापूर्वी १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने असा फटका दिला होता. महाबळेश्वरमध्ये उगम पावणा-या कृष्णा नदीचे हे खोरे आहे. महाबळेश्वर ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळील दाजीपूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून दोन डझन नद्यांचा उगम होतो. त्यांपैकी बहुतांश नद्यांवर धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता सुमारे २१० टीएमसी आहे. या सर्व नद्यांचा संगम होत होत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे सर्व पाणी जमा होते. तेथून कृष्णा नदी कर्नाटकात जाते.

नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली आहेत आणि नद्यांच्या पात्रापर्यंत शेतजमिनी तयार करून उसाची शेती नदीकाठापर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था झाली आहे.

नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाºया रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा फटका आहे. महापुराची तीव्रता गंभीर करणारी ही कारणे ठरली आहेत. कमी कालावधीत पडणारा मोठा पाऊस, धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरणे आणि पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पडणाºया पावसाच्या पाण्याचा समावेश करून घेण्यास जागा नसणे आदी मानवी चुकांचा सर्वाधिक फटका बसत आहे.

गतवेळच्या महापुराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारे धोके आजवर रेकॉर्डवर आलेले आहेत. तरीही राज्य प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने काळजी घेत नाही हीदेखील मानवी चूकच आहे. सांगलीजवळील ब्रह्मनाळची घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. क-हाड ते सांगलीपर्यंत किती पाणीपातळी कोठे आली, तर कोणती गावे संकटात येतात, याचे गणित मांडावे असे आहे. २००५च्या पुरातही ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले गेले होते. या गावाला सर्वप्रथम हलविण्याची गरज आहे. त्यासाठी एनडीआरएफ किंवा लष्कराला पाचारण केले पाहिजे. हरिपूर या गावची हीच कहाणी आहे. तेथे तर नदीच्या काठावरच बंगले बांधले गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पूर आल्यावर आंबेवाडी, प्रयाग चिखलीसारखी गावे सर्वप्रथम पाण्याने वेढली जातात. पडणारा पाऊस, भरलेली धरणे, त्यातून सोडण्यात येणारे पाणी तसेच कोल्हापूर आणि सांगलीचा कोणता भाग पाण्याखाली जाणार, हे गणिताप्रमाणे मांडता येऊ शकते; पण हे सर्व रेकॉर्ड, नकाशे तयार कोठे आहेत? ही प्रशासनाची म्हणजे मानवाची चूक आहे. ब्रह्मनाळचे बळी त्याचे आहेत, निसर्गाने घेतलेले नाहीत.

‘अलमट्टी’ची चर्चा ही केवळ फसवाफसवी

कर्नाटकातील बागलकोटजवळ कृष्णा नदीवर असलेल्या अलमट्टी धरणामुळे फुगवटा येतो. परिणामी, महाराष्ट्रातील नद्यांची पातळी वाढते, अशी चर्चा राजकारणी मंडळी करून लोकांची दिशाभूल करतात. महाराष्ट्रातून साडेतीन लाख क्युसेक्स पाण्याची आवक अलमट्टी धरणात होत असेल, तर त्यांना चार लाख क्युसेक्स पाणी सोडावे लागते. ते यापूर्वी सोडले आहे. यावषीर्ही सोडले. याचा परिणाम अलमट्टी धरणाच्या खालील रायचूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. आपल्याकडील पाणी पुढे सरकत नाही. ते अडविले गेले असल्याने महापुराची तीव्रता वाढली आहे. याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ‘अलमट्टी’ची चर्चा घडवून फसवाफसवी केली जात आहे.

Web Title: Flood is Kolhapur & Sangli is not only natural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.