कुकडी नदीला पूर, सावधानतेचा इशारा
By admin | Published: July 12, 2016 01:56 AM2016-07-12T01:56:25+5:302016-07-12T01:56:25+5:30
जुन्नर तालुक्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी समाधानकारक झाली आहे़
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी समाधानकारक झाली आहे़ येडगाव धरण ६८.६२ टक्के भरले असून या धरणातून कुकडी नदीला २७०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कुकडी नदीला पूर आला आहे. बंधारे पाण्याखाली गेले असून रांजणगाव खळगे पाण्याखाली गेले आहेत.
जुन्नर - आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा २२.९२ टक्के झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी. बी़ नन्नोर यांनी दिली़
तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे़ तालुक्यातील बहुतांश केटीवेअर, प्रमुख नद्या, बंदरे हे ओसंडून वाहू लागले आहेत़ तालुक्यातील प्रमुख माणिकडोह धरणाची पातळी क्षमता वाढलेली असून वडज धरणदेखील ४५ टक्के भरलेले आहे़ सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात आजमितीस ६९९८ दलघफु (२२.९२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आजमितीस २७७५दलघफुट (९.०८ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता़
कुकडी नदीला पाणी सोडण्यात येत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाने दिला आहे़ नदीच्या लगत
असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी काढून घ्याव्यात, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
नीरा-देवघर ३१.८२, भाटघर ३२.८४ टक्के
भोर : भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा-देवघर धरणभागात आज १२३ मिमी पाऊस होऊन धरण ३१.८२ टक्के भरले आहे. नीरा नदी दुथडी भरून वाहात आहे.
भाटघर धरणभागात आज ४७ तर एकूण ३३१ मिमी पाऊस झाला आहे. धरण ३२.८४ टक्के भरले आहे. गतवर्षीची पावसाची सरासरी ओलांडली आहे. नीरा-देवघर धरणभागात आज १२३ तर एकूण ८३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे.
उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू
बारामती : मागील आठवड्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. वर्षभरापासून वजा पातळीत असलेल्या उजनी धरणात देखील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ४ ते ५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणामध्ये येत आहे. तर दौंडमधून १४ हजार क्युसेक्स वेगाने पाणी भीमा नदीत येत आहे. मात्र हे पाणी धरणाच्या भिंतीपर्यंत येण्यासाठी सुमारे २४ तास लागतील, अशी माहिती उजनी धरण सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सध्या भीमा नदीचे पात्र डिकसळ गावापर्यंत कोरडे आहे. या गावापर्यंत उजनीच्या पाण्याचा फुगवटा असतो. मात्र मागील वर्षीच्या भीषण दुष्काळामुळे उजनी धरणांने नीचांकी पातळी गाठली होती. सध्यादेखील उजनी धरण वजा पातळीत आहे. धरणामध्ये सध्या ३८ टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. खडकवासला धरण साखळीमध्येदेखील पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरण ७४ टक्क्यांपर्यंत भरले आहे. तर मुळा, मुठादेखील दुथडी भरून वाहत आहेत.
तसेच इंद्रायणी नदीदेखील पात्राबाहेर वाहत आहे. इंद्रायणीचे पाणी उजनी धरणामध्ये येण्यासाठी किमान ३६ तास लागतात. धरणाच्या वरील भागात पावसाचा जोर असाच राहिला तर उजनी धरण वेगाने वजा पातळीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे. मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनादेखील मोठ्या प्रमाणात झळ पोहचली होती.
आतापर्यंत ३0२.५ मिलिमीटर
पुणे : जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली असून, जिल्ह्यात पावसाने ३0२.५ मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्याच्या अवघ्या १0 दिवसांत सरारसरी २२१ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शेती, जनावरांना चारा, पिण्याला पाणी असे सगळेच प्रश्न आता सुटले आहेत.
सध्या पाऊस सुरू असल्याने पेरण्या होत नसल्या, तरी पाऊस थांबल्याबरोबर पेरण्यांना वेग येईल. तसेच, भातशेतीला हा पाऊस अत्यंत उपयुक्त असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
जून व जुलै या महिन्यांत पुण्यात सरासरी ४३८.१ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) देशात आणि महाराष्ट्रातही उशिरा आगमन केले. त्यामुळे तो उशिरा दाखल झाला. जून महिन्याचा शेवटचा आठवडा वगळता संपूर्ण महिना कोरडा गेला. जून महिन्यात शहरात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्याही रखडल्या. जुलै महिना पाऊस घेऊन आला. दहा दिवसांत सरासरीच्या २२१ मिलिमीटर इतका दमदार पाऊस झाला आहे.
विशेष म्हणजे, बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांनी दोन महिन्यांची सरासरी ओलांडली आहे.
बारामतीत दोन महिन्यांत सरासरी १३५.२ मिमी इतका पाऊस होता, तो आता १३५.४; तर इंदापूर तालुक्यात १५५.२ इतका होतो, तो १८२.३ मिलिमीटर इतका झाला आहे. दर वर्षी या भागात पावसाचे प्रमाण अल्प असते. तेथे या वर्षी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील दुष्काळ यंदाचा पाऊस हटविणार, अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यात २२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्याची २९५.६८ मिलिमीटरची सरासरी पुढील दोन दिवसांत तो नक्कीच ओलांडून जूनचा बॅकलॉग भरून काढेल, अशी शक्यता आहे.
कळमोडी धरण फुल्ल
चासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. सोमवारी (दि. ११) सकाळी ६ वाजता धरणाच्या सांडव्यावरून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता
दीड टीएमसी असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये पहिले धरण भरण्याचा मान कळमोडीने पटकावला आहे. धरण भरल्याची माहिती सहायक अभियंता श्रेणी १ एस. जी. शहापुरे तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली आहे. कळमोडी धरण भरल्यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
१ जूनपासून धरण परिसरात ३७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
करंजाळे येथे डोंगरकडा कोसळला
खोडद : जुन्नर तालुक्यात गेल्या ३-४ दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून, या दमदार तडाख्याने रस्ते खचणे, दरडी कोसळणे, डोंगरकडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहे. माळशेज घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच या घाटाजवळील करंजाळे येथील रस्त्याशेजारील डोंगराचा २०० ते २५० फूट उंचीचा कडा कोसळून त्यातील झाडंझुडपं व मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला.
ही घटना सोमवारी (दि.११) सकाळी ९ च्या सुमारास विशाखापट्टणम महामार्ग क्र. २२२ अहमदनगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटाच्या अलीकडे करंजाळे गावाजवळ घडली. या घटनेत कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वाहतूक बंद आहे.
कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटाच्या अलीकडे असलेल्या करंजाळे गावाजवळ सोमवारी (दि.११) सकाळी ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच करंजाळे गावातील कांताराम चकवे, योगेश जगताप,अमोल घोलप, गणपत मस्करे, नीलेश ढोबळे, सोपान जगताप, रोहिदास पवार, तुकाराम लांघी, यशवंत अडीवळे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातील झाडंझुडपं बाजूला केली. (वार्ताहर)
या पूर्वी मागील आठवड्यात रविवारी (दि. ३) रात्री १०च्या सुमारास माळशेज घाटात मोठी दरड कोसळली होती. सुदैवाने या वेळी कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाली नाही, मात्र त्या घटनेनंतर लगेचच ८ दिवसांत म्हणजे रविवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास माळशेज घाटाच्या शेवटी दरड कोसळण्याची ही दुसरी घटना घडली, तर आज सकाळी याच मार्गावर करंजाळे गावाजवळ डोंगरकडा कोसळण्याची घटना घडल्याने माळशेज घाट सुरक्षिततेचा प्रश्न आता तीव्रतेने ऐरणीवर आला आहे.
माळशेज घाट परिसरात दरवर्षी पावसाळ्यात राज्यातून तसेच राज्याबाहेरून हजारो पर्यटक येत आहेत. माळशेज घाटात इतर अन्य ठिकाणीही दरड कोसळण्याचा धोका आहे. या घाटात शासनाकडून प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने दरवर्षी येथे उपाययोजना केल्या जातात, मात्र एवढं सगळं करूनही घाटात कोसळणाऱ्या दरडी व होणारे अपघात मात्र घडतच आहेत. माळशेज घाटात प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.