मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती; शेकडो गावांचा संपर्क तुटला, शेतशिवारात पाणीच पाणी, पिकांचा चिखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:57 AM2024-09-03T06:57:06+5:302024-09-03T07:07:49+5:30

Flood situation in Marathwada & Vidarbha: मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारीही अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला.

Flood situation in Marathwada, Vidarbha; Contact with hundreds of villages was lost, there was only water in the fields, crops were covered in mud | मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती; शेकडो गावांचा संपर्क तुटला, शेतशिवारात पाणीच पाणी, पिकांचा चिखल

मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती; शेकडो गावांचा संपर्क तुटला, शेतशिवारात पाणीच पाणी, पिकांचा चिखल

 मुंबई -  मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारीही अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला. पिकांचाही चिखल झाला.  

नांदेड, परभणी व हिंगोलीमधील १६ प्रकल्पांमधून विसर्ग करण्यात येत असल्याने गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अकोला जिल्ह्यांतील शिवारं जलमय झाली आहेत.  नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात केले आहे. जायकवाडी धरण ८८ टक्के भरले आहे. या अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरांचा मृत्यू झाला असून, १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    

बैल धुताना बुडून मृत्यू   
बुलढाणा : पोळ्यानिमित्त बैल धुताना बुडून जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला. देवधाबा (ता.मलकापूर) येथे प्रकाश शिवदे, हरणखेड (मलकापूर) येथे गोपाळ वांगेकर, रोहीणखेड (मोताळा) येथे महेंद्र चव्हाण, डोणगाव (ता.मेहकर) येथे आकाश उर्फ अक्षय नंदेकर याचा मृत्यू झाला. जळगावात वाघझिरा (ता. यावल) येथे एकाचा मृत्यू झाला.

पुरात वाहून गेल्याने मृत्यू 
जालना : बानेगाव (ता.घनसावंगी) येथे शिवाजी शिंदे (४८) यांचा बुडून मृत्यू.
चंद्रपूर : मराठागुडा ते शेडवाहीदरम्यान (ता.जिवती) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेलंगणातील युवकाचा मृत्यू. 
नांदेड : पासदगाव येथे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा युवक वाहून गेला. 
यवतमाळ : आकपुरी नाल्याच्या पुरात सुरेश गवते (४०) हे वाहून गेले.   
अकोला : चान्नी  (ता.पातूर) येथील रुक्मिणी पवार (४०) ही महिला वाहून गेली. 
सिंधुदुर्ग : माडखोल धवडकी येथे नोव्हेल फेलिक्स (३०, रा. मुंबई) या ख्रिस्ती धर्मगुरूचा नदीत बुडून मृत्यू.

३९ जण बचावले 
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात चार गावांतून ३९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढले.

आजचा अंदाज काय? 
संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव याशिवाय सातारा आणि पुणे जिल्ह्याला मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Web Title: Flood situation in Marathwada, Vidarbha; Contact with hundreds of villages was lost, there was only water in the fields, crops were covered in mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.