वसई-विरारमध्ये पूर, एकाचा बळी
By admin | Published: September 23, 2016 04:29 AM2016-09-23T04:29:01+5:302016-09-23T04:29:01+5:30
पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती. मिठागर पाड्यात चारशे लोक अडकून पडले होते.
वसई : पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती. मिठागर पाड्यात चारशे लोक अडकून पडले होते. तर वालीव येथे रात्री नाल्यात एक जण वाहून गेला. सकाळी आठ वाजल्यानंतर पाऊस थांबल्याने पाणी ओसरले व लोकांना दिलासा मिळाला.
वैतरणा रेल्वे स्टेशन परिसरातील गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांचे हाल झाले.
कुर्झे धरणाचे दरवाजे उडाल्याने वेरोली नदीला पूर येऊन झरी खाडी येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने काल संध्याकाळपासूनच तलासरीवरून उंबरगाव, संजाणकडे जाणारी वाहतूक आजही बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाता आले नाही.
मुसळधार पावसाने झाई ब्राह्मणगाव येथील ४१ घरांत पाणी घुसले. यापैकी ९ लोकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांचे धान्य, कोंबड्या, जळाऊ लाकडे वाहून गेल्याने नुकसान झाले. (प्रतिनिधी)