राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने नदयांना पूर!

By admin | Published: September 23, 2016 04:27 AM2016-09-23T04:27:26+5:302016-09-23T07:36:41+5:30

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी मुंबईसह कोकणाला मुसधार पावसाने झोडपून काढले

Floods flood the rivers in the whole of the state! | राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने नदयांना पूर!

राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने नदयांना पूर!

Next

मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी मुंबईसह कोकणाला मुसधार पावसाने झोडपून काढले. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पूरस्थितीने पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. खान्देशात नंदाळे गावात (जि. धुळे) अतिवृष्टीमुळे तलावाचा बांध फुटल्याने हाहा:कार उडाला असून एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला.

कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पेण येथे ३२०, हर्णे २२०, चिपळूण १६०, मुंबई, कोयना १५०, महाड, पोलादपूर, सुधागड पाली १३० मिमी पावसाची नोंद झाली़ मुसळधार पावसामुळे मुंबईतील जीवनही विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली होती. लोकल सेवेवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला.

तलावाचा बांध फुटल्याने नंदाळेत हाहा:कार
धुळ््याजवळील नंदाळे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे लगतच्या तलावाचा बांध फुटल्याने एकच हाहा:कार उडाला. तलावाचे पाणी प्रचंड वेगाने शेतांमध्ये शिरल्याने उभी पिके आडवी झाली़ अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे नाले तुडूंब भरून वाहत असल्याने गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला होता़ तर मंदिरावर वीज कोसळल्याने संगम कृष्णा वाघ (२३) याचा मृत्यू झाला़

मराठवाड्यात दोघांचा मृत्यू
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारात वीज पडून सालगडी नितीन प्रकाश खंदारे (३५,), राम तुकाराम कन्हेरकर (२४) हे दोघे मृत्युमुखी पडले. तर अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यात दमदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून देगलूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. तेरणा व मांजरा नदीस आलेल्या पूरात पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेल्या चौघांना पोहता येत असल्याने सर्वजण बचावले.

तेरणा व मांजरा संगमानजीक औराद शहाजानी येथील रामदास खरटमोल गुरुवारी शेतात गेले असता अचानक दोन्ही नद्यांना पूर आल्याने ते शेतातच अडकून पडले आहेत़ रात्री उशीरापर्यंत ते शेतातून बाहेर आले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले़



कोकणातील नद्यांना पूर
कोकणातील जगबुडी चोरद आणि नारींगी नदीला महापूर आला आहे. चोरद नदीवरील पुलावरून पाणी जाऊ लागल्याने खेड आंबवली मार्गावरील सुमारे ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. नारींगी नदीने देखील पाण्याची पातळी ओलांडल्याने एकूणच पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. चिपळूण शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडीला पूर आला आहे.


दोन दिवस पावसाचेच
येत्या दोन दिवस मुसळधार कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शुक्रवारी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ शनिवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़

तरुणाचा बुडून मृत्यू
जळगाव : तामसवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बोरी नदीला आलेल्या पुरात अमळनेरातील पैलाड भागातील राम चंदनशिव हा तरुण बुडून मृत्युमुखी पडला. तर फरशीपुलाचा भराव वाहून दोन्ही बाजुने मोठे खड्डे पडले. पाणी नदीच्या नागरी वस्तीत शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे.

Web Title: Floods flood the rivers in the whole of the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.