भिवंडीतील तानसा नदीला आला पूर, घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:35 PM2017-08-29T20:35:33+5:302017-08-29T20:37:00+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत.
भिवंडी, दि.29 - गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत. ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत असल्याने आणि तानसा धरण पूर्ण भरल्याने त्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे येथील तानसा नदीला पूर येऊन अकलोली, गणेशपुरी येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी अकलोली रस्ता व वज्रेश्वरी केलथन पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सुमारे सहा गावांचा संपर्क तुटला. अकलोली येथील गरम पाण्याची सर्व कुंडे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे १२ते१५ घरांमध्ये आणि कुंडांजवळच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं काही प्रमाणात वित्तहानी झाली परंतु नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने कोणतीही जीवितहानी किंवा अधिक नुकसान झालेले नाही.
त्याचप्रमाणे गणेशपुरी येथील कॉलनीमध्येही पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले आहे आणि शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक आले होते पण पुरामुळे त्यांचे हाल झाले आहेत. या सर्व परिस्थितीची भिवंडी तहसीलदार शिशिकांत गायकवाड यांनी स्वतः अकलोली वज्रेश्वरी येथे येऊन पूर परिस्थितीची पाहणी करून बाधितांना नुकसानभरपाई करण्यासाठीचे आदेश संबंधिताना दिलेत.